पर्यावरण रक्षणासाठी निसर्गदूत फौंडेशनची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:21 AM2021-03-24T04:21:16+5:302021-03-24T04:21:16+5:30
कोल्हापूर : पर्यावरणाचे जतन, संवर्धन व्हावे व नागरिकांमध्ये जागृती व्हावी यासाठी निसर्गदूत फौंडेशनची स्थापना करण्यात येत आहे. आपल्या वाढदिवसाचे ...
कोल्हापूर : पर्यावरणाचे जतन, संवर्धन व्हावे व नागरिकांमध्ये जागृती व्हावी यासाठी निसर्गदूत फौंडेशनची स्थापना करण्यात येत आहे. आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज बुधवारी जरग नगर येथील भालचंद्र चिकोडे ग्रंथालय शेजारील बागेचे सुशोभिकरण करून या कामाची सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती भाजप महानगर अध्यक्ष राहुल चिक्कोडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
चिक्कोडे म्हणाले, या संस्थेच्या माध्यमातून शहरात जास्त ऑक्सिजन देणारी झाडे तसेच कार्बन डायऑक्साईड शोषणारी झाडे लावून त्यांचे संगोपन करण्यात येणार आहे. प्लास्टिकमुक्तीसाठी इको फ्रेंडली वस्तूंचा आग्रह, प्लास्टिक बाय प्रॉडक्ट तयार करणे, कापडी-खादीच्या पिशव्यांचा वापर यासाठी प्रयत्न केले जातील. रेन वॉटर हार्वेस्टिंग तसेच पाणी वाचवणे-जिरवणे अशा योजना राबविण्यात येणार आहेत. सुहास वायंगणकर, डॉ. मधुकर बाचुळकर, उदय गायकवाड, अनिल चौगुले, दीपक देवलापूरकर, अमोल बुद्धे अशा पर्यावरण तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात येणार आहे. परिषदेस चंदन मिरजकर, प्रमोद पाटील, जयदीप मोरे, सचिन साळोखे, अनिल चौगुले, शंतनू मोहिते, योगेश चिकोडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
--