राष्ट्रीय संघटनेआधी कोल्हापूर मेडिकल असोसिएशनची स्थापना, शतक महोत्सवास प्रारंभ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 02:03 PM2023-03-30T14:03:52+5:302023-03-30T14:04:16+5:30
पहिल्यांदा कोल्हापूरमध्ये एखादा निर्णय व्हावा आणि त्याची अंमलबजावणी देशभरात व्हावी ही परंपरा शाहू महाराजांनी सुरू केली.
समीर देशपांडे
कोल्हापूर : पहिल्यांदा कोल्हापूरमध्ये एखादा निर्णय व्हावा आणि त्याची अंमलबजावणी देशभरात व्हावी ही परंपरा शाहू महाराजांनी सुरू केली. त्याच पद्धतीने देशपातळीवरील मेडिकल असोसिएशनची स्थापना होण्याआधी चार वर्षे कोल्हापूर मेडिकल असोसिएशनची स्थापना झाली आणि नंतर ही संकल्पना देशपातळीवर अवलंबण्यात आली. आज हीच संघटना शाहू छत्रपती आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या उपस्थितीमध्ये शताब्दी वर्षात पदार्पण करत आहे हे कोल्हापूरसाठीही अभिमानास्पद आहे.
देशाच्या संघटनेआधी चार वर्षे म्हणजे एप्रिल १९२४ मध्ये कोल्हापूरमध्ये संघटना स्थापन करण्याचा हा द्रष्टेपणा दाखवला कोल्हापूरचे तत्कालीन ख्यातनाम डॉ. जी. जी. वाटवे यांनी. त्यामुळेच देशभरातील अन्य जिल्ह्यांच्या शाखांचा उल्लेख इंडियन मेडिकल असोसिएशनच्या शाखा असा केला जातो; परंतु कोल्हापूरला मात्र कोल्हापूर मेडिकल असोसिएशन असा उल्लेख करण्यासाठी खास परवानगी आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी डॉ. वाटवे यांच्या घरी संघटनेची बैठक व्हायची. तीन वर्षे या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून वाटवे यांनी काम पाहिले.
यानंतर प्रत्येक संस्थेच्या बाबतीत जसे चढ-उतार येतात, तसेच या संघटनेबाबत आले; परंतु प्रत्येक वेळी सामूहिक बळावर संघटना वृद्धिंगत होत राहिली. वेगवेगळ्या शाखांच्या डॉक्टरांनी या संघटनेचे अध्यक्षपद भूषवले आणि प्रत्येकाने काही ना काही वेगळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला. बेलबागेतील ‘केएमए’चे प्रशस्त कार्यालय हे कोल्हापूरच्या वैद्यकीय विश्वातील अनेक उपक्रमांचे माहेर बनले.
दर महिन्याला या ठिकाणी वैद्यकीय क्षेत्रातील बदलांबाबत चर्चासत्रे होतात. वर्षभरात एखादे राष्ट्रीय चर्चासत्र मोठ्या स्वरूपात घेतले जाते. या १०० वर्षांत जसा वैद्यकीय व्यवसाय बदलत गेला त्याच पद्धतीने संघटनाही विकसित होत गेली. आपापल्या कार्यक्षेत्रात कोल्हापूरचे हे सर्व डॉक्टर्स कुशल मानले जात असताना त्यांनी इतर कलाकौशल्याकडेही दुर्लक्ष केले नाही. त्यामुळेच दरवर्षी संघटनेच्या वतीने न चुकता गाण्यांचा कार्यक्रम केला जातो आणि अतिशय बहारदारपणे तो सादर होतो.
गेली २५ वर्षे बालरुग्णांची केएमएमध्ये तपासणी केली जाते. वयोवृद्धांसाठीही या ठिकाणी उपचार आणि मार्गदर्शन केंद्र चालवले जाते. आता या ठिकाणी स्त्री आरोग्य केंद्रही सुरू होत असून चारच दिवसांपूर्वी ३०० मुलींना गर्भमुख कॅन्सर प्रतिबंधक लस दिली गेली. अजूनही या लसीकरणाची मागणी असून ती पूर्ण केली जाणार आहे. कोरोनाकाळात असोसिएशनचे सदस्य डॉक्टर तंबू टाकून सीपीआरच्या आवारात रुग्णांना तपासत होते. पूरकाळात प्रशासनाने जी वैद्यकीय मदत मागितली ती मदत ‘केएमए’ने देऊ केली आहे.
कोल्हापूरला मोठी संधी
दर्जेदार उपचार, चांगली हवा आणि तुलनेत स्वस्त उपचार पद्धती यामुळे केवळ देशभरातूनच नव्हे, तर जगभरातून अनेक रुग्ण कोल्हापूरला येतात. हेच प्रमाण वाढून कोल्हापूर एक उत्तम मेडिकल हब होण्यासाठी संघटनेची भूमिका महत्त्वाची आहे.
सर्व पॅथींना संधी
अन्य जिल्हा शाखांमध्ये केवळ ॲलोपॅथीच्या डॉक्टरांना सभासद करून घेतले जाते; परंतु ‘केएमए’ याला अपवाद आहे. कारण ही जुनी संघटना असल्याने या संघटनेत सर्व पॅथींना संधी देण्यात आली आहे.