तासगावात कारभाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला
By Admin | Published: October 25, 2015 11:43 PM2015-10-25T23:43:58+5:302015-10-26T00:09:59+5:30
बालेकिल्ला ताब्यात ठेवण्याचे आव्हान : राष्ट्रवादी, भाजपच्या पदाधिकाऱ्यांत ईर्षा -ग्रामपंचायत निवडणूक
दत्ता पाटील --तासगाव तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतींपैकी बहुतांश लढती दुरंगी होत आहेत. या निवडणुकीने तालुका आणि जिल्हा पातळीवर, पक्षीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारी संस्थांत पदे भूषविणाऱ्या कारभाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ग्रामपंचायतीचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्याचे आव्हान पेलण्यासाठी राष्ट्रवादी, भाजप आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांत टोकाची ईर्षा होताना दिसून येत आहे.
ग्रामपंचायतीचा बालेकिल्ला अभेद्य राहिला तरच तालुका आणि जिल्हा पातळीवर पदांचे दरवाजे खुले होतात, हे राजकीय समीकरण आहे. आतापर्यंत अशी पदे भूषविलेल्या आणि सध्या पदावर असणाऱ्या सर्वच राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून अस्तित्व पणाला लावून, या निवडणुका लढवल्या जात आहेत. काही पदाधिकाऱ्यांकडे अनेक वर्षांपासून सातत्याने सत्तेचा कारभार राहिला आहे, तर काही पदाधिकाऱ्यांना गावाच्या सत्तेची सूत्रे हातात घेण्याची महत्त्वाकांक्षा आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या गावांत टोकाचा संघर्ष होताना दिसून येत आहे.
विसापूरमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील पाटील, तासगाव सूतगिरणीचे उपाध्यक्ष पतंगबापू माने, बोरगावात पंचायत समिती सभापती सुनीता पाटील, अर्जुन पाटील, ढवळीत आर. आर. पाटील खरेदी- विक्री संघाचे संचालक अमोल पाटील, शिरगावात जिल्हा बँकेचे संचालक डॉ. प्रताप पाटील, हातनोलीत तासगाव बाजार समितीचे संचालक अजित जाधव, पेडमध्ये पंचायत समितीचे सदस्य प्रभाकर पाटील, माजी सरपंच दत्तूअण्णा खाडे, मांजर्डेत जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिनकर पाटील, हातनूरमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष पाटील, कवठेएकंदमध्ये पंचायत समितीचे उपसभापती अशोक घाईल, पंचायत समितीचे सदस्य जयवंत माळी, सावळजमध्ये जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वसंत सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर उनउने, पंचायत समिती सदस्य चंद्रकांत पाटील, लोढेमध्ये बाजार समिती संचालक पितांबर पाटील, आर. आर. पाटील संघाचे विलास पाटील, वज्रचौंडेत सूतगिरणी संचालक संजय यादव, येळावीत माजी पंचायत समिती सभापती विजयअण्णा पाटील, तुरचीत पंचायत समिती सदस्या हर्षला पाटील, संजय पाटील, वडगावमध्ये माजी पंचायत समिती सभापती संजय पाटील, डोंगरसोनीत बाजार समितीचे उपसभापती सतीश झांबरे, पंचायत समिती सदस्य मेघा झांबरे, गव्हाणमध्ये राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष हणमंत देसाई या पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी, भाजप आणि काँग्रेसच्या गावकारभाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे.
विसापुरात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडे भाजपचे नेतृत्व
विसापूरमध्ये राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील पाटील यांच्या पॅनेलविरोधात राष्ट्रवादीचेच सूतगिरणीचे उपाध्यक्ष पतंगबापू माने यांचे पॅनेल आहे. दोन्ही पदाधिकारी राष्ट्रवादीचे आहेत. मात्र सुनील पाटील नेतृत्व करत असलेल्या पॅनेलमध्ये भाजपच्या टीमचा समावेश आहे. या लढतीकडे आता ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांविरोधात भाजपची रसद
तालुकास्तरावर पदांच्या माध्यमातून राजकारण करणाऱ्या पदाधिकाऱ्यांत भाजपपेक्षा राष्ट्रवादीच्याच कारभाऱ्यांचा भरणा जास्त आहे. या पदाधिकाऱ्यांचे आव्हान मोडीत काढल्यास, भाजपला तालुक्यावर वर्चस्व मिळविण्याचा मार्ग सोपा होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे पदाधिकारी असलेल्या गावांत भाजपने विशेष लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे.
सावळजमध्ये आबा गटांतर्गत संघर्ष
सावळजमध्ये राष्ट्रवादीअंतर्गत पंचायत समिती सदस्य चंद्रकांत पाटील यांच्या गटाविरोधात माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर उनउने आणि वसंत सावंत यांच्या गटातच अनेकदा निवडणुका झाल्या आहेत. यावेळी आमदार सुमनताई पाटील यांच्या आवाहनामुळे गट-तट विसरून हे नेते एकत्रित येतील, अशी चर्चा होत होती. मात्र ही चर्चा फोल ठरली असून, आबा गटांतर्गतच सामना होत आहे. खासदार संजयकाका समर्थकांनी या निवडणुकीत किशोर उनउने व वसंत सावंत यांचे नेतृत्व स्वीकारले आहे.