श्रमिक कल्याणासाठी प्रतिष्ठान कार्यरत
By Admin | Published: February 8, 2016 12:14 AM2016-02-08T00:14:21+5:302016-02-08T00:31:22+5:30
वैचारिक व्यासपीठ : राज्यव्यापी व्याख्यानाचे आयोजन; विविध उपक्रम, पुस्तिकांचे प्रकाशन, संकेतस्थळही अद्ययावत - लोकमतसंगे जाणून घेऊन
भीमगोंडा देसाई -- कोल्हापूर--कष्टकरी, श्रमिक यांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी व कल्याणासाठी येथील ‘श्रमिक प्रतिष्ठान’ कार्यरत आहे. ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते व विचारवंत अॅड. गोविंद पानसरे यांनी स्थापन केलेल्या या संस्थेच्या व्याख्यानमालेची ख्याती राज्यभर आहे. राज्यात प्रतिष्ठानने एक वेगळी वैचारिक ओळख निर्माण केली आहे. प्रत्येक वर्षी नोव्हेंबर, डिसेंबर महिना सुरू झाल्यानंतर व्याख्यानमालेचे वेध श्रोत्यांना लागलेले असतात. कोल्हापूर जिल्हा सहकारी बँक कर्मचारी संघटनेचे रौप्यमहोत्सवी वर्ष १९९४ मध्ये साजरे झाले. त्यावेळी कामगारांचे प्रबोधन करण्यासाठी आणि समाजाच्या विकासासाठी श्रमिक प्रतिष्ठानची मुहूर्तमेढ अॅड. पानसरे यांनी रोवली. बँक कर्मचारी संघटनेचे नेते बाबा साठम, आनंदराव परुळेकर, बाबा ढेरे, आदींनी प्रतिष्ठानची स्थापना केली. साहित्य, संगीत, कला, क्रीडा प्रबोधन करणे हे प्रतिष्ठानचे ध्येय ठरविण्यात आले. आर्थिक जीवन सुधारण्यासाठी संघटित होऊन संघर्ष करणाऱ्या कामगारांचे हक्काचे विचारपीठ म्हणजे श्रमिक प्रतिष्ठान, असे अॅड. पानसरे नेहमी सांगत असत. स्वत:च्या आणि समाजाच्या जाणिवा प्रगल्भ करण्यासाठी विचारमंच म्हणून प्रतिष्ठान ठसा उमटवत आहे.
२००२ मध्ये प्रतिष्ठानतर्फे व्याख्यानमाला सुरू झाली. आता अवि पानसरे व्याख्यानमाला म्हणून ती राज्यात परिचित आहे. एकाच बीज विषयाच्या आठ विविध पैलंूवर नामवंत तज्ज्ञांना निमंत्रित करण्यात येते. दरवर्षी व्याख्यान ऐकण्यासाठी रेकॉर्ड ब्रेक गर्दी होते. म्हणूनच अवि पानसरे व्याख्यानमालेस येणे वक्त्यांना प्रतिष्ठेचे वाटत असते. या व्याख्यानमालेसाठी बुद्धिजिवी, जाणकार लोक स्वत:हून आर्थिक मदत करतात. व्याख्यानमालेच्या पहिल्या आणि शेवटच्या दिवसाच्या व्याख्यानाचे अध्यक्षपद अॅड. गोविंद पानसरेच भूषवित असत. त्यांची हत्या झाल्यानंतर गतवर्षीच्या व्याख्यानमालेच्या अध्यक्षपदाची जागा दुसऱ्यांनी स्वीकारली. व्यासपीठावर ते नसल्याने त्यांची पोकळी वक्ते आणि श्रोते यांनाही प्रकर्षाने जाणवली. व्याख्यानातील प्रत्येक वक्तव्याच्या भाषणाची सीडी व पुस्तिका तयार करण्यात येते. त्यांना राज्यभरातून मागणी आहे. अनेक विद्यापीठांत संदर्भ म्हणूनही त्यांचा वापर होतो.
‘श्रमिक’च्या कार्यालयात इच्छुकांसाठी पुस्तके मिळतात. श्रमिक प्रतिष्ठानच्या पुढाकाराने आणि इतर संस्था, संघटना यांच्या सहभागाने २००८ पासून कॉम्रेड अण्णा भाऊ साठे राज्यस्तरीय साहित्य संमेलन घेण्यात येते.
पहिले संमेलन कोल्हापुरातच झाले. त्यानंतर अहमदनगर, नांदेड, नागपूर, नाशिक येथे संमेलने
झाली. गतवर्षी सावंतवाडी येथे संमेलन झाले. तंत्रज्ञानाचा वापर प्रतिष्ठानने केला पाहिजे, या अॅड. पानसरे यांच्या प्रेरणेतूनच या संमेलनात ‘श्रमिक प्रतिष्ठान’च्या संकेतस्थळाचे उद्घाटन झाले. यावर प्रतिष्ठानचे उपक्रम व संस्थेचा इतिहास, उद्देश यांची सविस्तर माहिती आहे. त्यामुळे इंटरनेट असल्यास एका ‘क्लीक’वर प्रतिष्ठानची माहिती देश, विदेशातील व्यक्तीला पाहता येते आहे. रोज अनेक लोक या संकेतस्थळाला भेट देत आहेत.
‘महाराष्ट्राची आर्थिक पाहणी-पर्यायी दृष्टिकोन’ हा ग्रंथ गेल्या वर्षी तयार केला. या ग्रंथात शंभर वर्षांत कोल्हापूर व राज्याच्या जडणघडणीत ज्यांनी योगदान दिले, त्या कर्तृत्ववान व्यक्तींचे जीवनचरित्र आहे. या कामगिरीची दखल घेत महाराष्ट्र फौंडेशनने प्रतिष्ठानचा सन्मान केला. तसेच प्रतिष्ठानतर्फे ज्वलंत विषयांवर अनेक लेखक, पत्रकारांकडून पुस्तिका लिहून घेतल्या आहेत. व्यापम, भूमी अधिग्रहण, कोल्हापूरचा टोल या विषयावरील पुस्तिकांना मागणी आहे. त्याच्या अनेक आवृत्त्याही निघाल्या.
आतापर्यंत ४० पुस्तिका प्रकाशित केल्या आहेत. याशिवाय शाळा, महाविद्यालयांत ग्रंथ प्रदर्शन भरविले जाते. अंधश्रद्धा, पर्यावरण अशा अनेक विषयांवर कार्यक्रम, उपक्रम घेतले जातात.
व्याख्यानमालेचे विषय असे...
विषय आणि कंसात वर्ष असे : जागतिकीकरण (२००२), धर्म (२००३), शिक्षण (२००४), होय पर्यायी जग शक्य आहे (२००५), भारताचे बदलते राजकारण (२००६), नव्या जागतिकीकरणानंतरचे जग व भारत (२००७), संयुक्त महाराष्ट्राची ५० वर्षे (२००८), एन.जी.ओ. (२००९), शेती वाचवा, देश वाचवा (२०१०), बदलते मराठी साहित्य व संस्कृती (२०१२), लोकशाही जनआंदोलने आणि निवडणुका (२०१३), भारतीय लोकशाहीचे भवितव्य (२०१४), लोकशाहीला धर्मांधतेचे आव्हान (२०१५) अशी व्याख्याने झाली. २०११ मध्ये व्याख्यानमाला झाली नाही.
ज्येष्ठ विचारवंत अॅड. गोविंद पानसरे यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या सहभागाने स्थापन झालेल्या श्रमिक प्रतिष्ठानची ओळख वैचारिक व्यासपीठ म्हणून आहे. व्याख्यानमालेत वर्षभर प्रबोधनाचे उपक्रम राबविले जातात. त्यांना प्रतिसाद मिळतो.
- प्रा. विलास रणसुभे,
अध्यक्ष, श्रमिक प्रतिष्ठान
बिंदू चौकात कार्यालय...
सुरुवातीपासून श्रमिक प्रतिष्ठानचे कार्यालय बिंदू चौकातील कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात आहे. कार्यालयातच प्रतिष्ठानच्या बैठका होत असतात. जिल्हा मध्यवर्ती बँक व गोकुळ येथील कर्मचारी, कोल्हापूर जिल्हा बँक कर्मचारी युनियन, रत्नाकर बँक कर्मचारी युनियन यांच्याकडून प्रतिष्ठानला आर्थिक पाठबळ मिळते.
आर्थिक मदतीचा पै आणि पै चा हिशेब ठेवला जातो. अतिशय पारदर्शकपणे कामकाज सुरू असल्यामुळे विश्वासार्हता कायम आहे.
पदाधिकारी असे...
अध्यक्ष : प्रा. विलास रणसुभे, ४उपाध्यक्ष : चिंतामणी मगदूम,
खजिनदार : एस. बी. पाटील, ४सचिव : आनंदराव परुळेकर,
सदस्य : मेघा पानसरे,दिलीप चव्हाण.