कुंभी कासारीच्या सभेत इथेनॉल प्रकल्पास मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:23 AM2021-03-15T04:23:52+5:302021-03-15T04:23:52+5:30
कोपार्डे : सध्याच्या डिस्टिलरीमध्येच आधुनिकीकरण करून इथेनॉल प्रकल्प उभारण्यासाठी कुंभी कासारी साखर कारखान्याच्या ५९ व्या वार्षिक आनलाईन सभेत मान्यता ...
कोपार्डे : सध्याच्या डिस्टिलरीमध्येच आधुनिकीकरण करून इथेनॉल
प्रकल्प उभारण्यासाठी कुंभी कासारी साखर कारखान्याच्या ५९ व्या वार्षिक आनलाईन सभेत मान्यता देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार व अध्यक्ष चंद्रदीप नरके होते.
अध्यक्ष चंद्रदीप नरके यांनी अतिरिक्त साखर उत्पादनामुळे गेल्या चार वर्षांपासून साखरेच्या दरात घसरण झाल्याने उद्योग आर्थिक संकटात आहे. एफआरपी आणि साखरेच्या दरात निर्माण झालेली तफावत यामुळे प्रतिक्विंटल सहाशे ते सातशे रुपये कारखान्यांना तोटा होत आहे. यावर इथेनॉल उत्पादन करणेही काळाची गरज झाली आहे. यासाठी या सभेत इथेनॉल प्रकल्पाचा पहिला टप्पा उभारण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. याला सभासदांनी मंजुरी द्यावी, असे आवाहन केले .
सभेचे नोटीस वाचन व वृत्तांत वाचन सचिव प्रशांत पाटील यांनी केले. ऑनलाईन चर्चेत एकनाथ पाटील, अजित नरके, बी. बी. पाटील, गुणाजी शेलार, संजय पाटील, अरुण पाटील, के. डी. पाटील, राजेंद्र सूर्यवंशी, पाटील सदाशिव शेलार, मारुती शेलार, जे. आय. निंबाळकर, विलास नाळे, दादू कामिरे यांनी भाग घेतला.
यावर अध्यक्ष चंद्रदीप नरके यांनी, पूर्वीच्या वार्षिक सभेत इथेनॉल प्रकल्पाला विरोध झाला, त्यामुळे आपण आर्थिक संकटात आलो. इतर कारखाने इथेनॉल उत्पादन करत आहेत. केंद्राचे साखर उत्पादन कमी करून इथेनॉल उत्पादन वाढविण्याचे धोरण आहे. यामुळे प्रकल्प ही काळाची गरज झाली आहे. यासाठी या प्रकल्पाला मंजुरी द्यावी, असे आवाहन केले.
यानंतर अहवालातील आकडेवारी फसवी आहे
याशिवाय अध्यक्ष चंद्रदीप नरके यांनी, सहवीज प्रकल्प व डिस्टिलरी विस्तारिकरण करताना काढलेल्या कर्जाने भविष्यात येणाऱ्या आर्थिक अडचणीचा विचार न करता कारखाना कर्जाच्या खाईत ढकलला असल्याचा आरोप एकनाथ पाटील यांनी केला. प्रथम थकलेली अनेक देणी द्या आणि मगच इथेनॉल प्रकल्प करावा. आमचा इथेनॉल प्रकल्पाला विरोध कायम राहील, असे एकनाथ पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
यानंतर यावर सविस्तर चर्चा होऊन इथेनॉल प्रकल्प उभारणीस मान्यता देण्यात आली. यावेळी साखरेचा हमीभाव ३६ रुपये करावा, प्रतिटन ५०० ते ६०० रुपये अनुदान द्यावे, बफर स्टॉकचे धोरण पूर्ववत ठेवावे, केंद्र शासनाने साखरेचे दुहेरी दर धोरण स्वीकारावे, २०२० /२१ची कृषिपंपांची वीजबिले माफ करावी, असे ठराव ऐनवेळचा विषय म्हणून संमत करण्यात आली. आभार उपाध्यक्ष निवास वातकर यांनी मानले. यावेळी सर्व संचालक, कार्यकारी संचालक, अधिकारी यांनी ऑनलाईन सभेत भाग घेतला.
(फोटो)
कुंभी कासारी कारखान्याच्या ५९ व्या वार्षिक सभेत बोलताना अध्यक्ष चंद्रदीप नरके, शेजारी उपाध्यक्ष निवास वातकर व संचालक.