चांगला दर देण्यासाठी इथेनॉल प्रकल्प
By Admin | Published: January 9, 2016 01:05 AM2016-01-09T01:05:40+5:302016-01-09T01:21:20+5:30
हसन मुश्रीफ : सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्यात इथेनॉल निर्यात प्रारंभ
सेनापती कापशी : कागल तालुक्यातील कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिल्यामुळेच घोरपडे साखर कारखाना उभा करू शकलो. हा कारखाना उभा करताना टोकाची राजकीय ईर्षा झाली. या सगळ्यावर मात करीत महाराष्ट्रातील आदर्श साखर कारखाना उभा करण्यात यशस्वी झालो. फक्त ऊस गाळून शेतकऱ्यांना चांगला दर देता येणार नाही, म्हणूनच वर्षभर चालणारा इथेनॉल प्रकल्प उभा केला, असे प्रतिपादन कारखान्याचे संस्थापक आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.
सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना बेलेवाडी काळम्मा (ता. कागल) कार्यस्थळावर कारखान्याने उत्पादित केलेल्या इथेनॉल निर्यात प्रारंभप्रसंगी ते बोलत होते.
ते म्हणाले, वर्षभर इथेनॉल प्रकल्प चालणारा हा देशातील दुसरा किंवा तिसरा प्रकल्प आहे. भविष्यात इथेनॉल निर्मितीला मोठी किंमत येणार आहे. त्यामुळे पुढील वर्षापर्यंत एक लाख लिटर इथेनॉल निर्मिती करणारा प्रकल्प उभा केला जाईल. कारखान्यात ३५ हजार लिटर इथेनॉल निर्मिती केली जात.
जिल्हा बँकेचे संचालक भैया माने म्हणाले, वर्षभर घाम गाळून ऊस उत्पादक शेतकऱ्याला चांगला दर देण्यासाठीच हा इंटिग्रेटेड प्रकल्प उभा केला आहे. दिलेला शब्द पाळणारा नेता अशी मुश्रीफ यांची ओळख आहे.
पंजाब नॅशनल बँकेचे वसिष्ट यांनी मनोगत व्यक्त केले. कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी स्वागत केले. डिस्टिलरी विभागाचे प्रमुख संतोष मोरबाळे यांनी प्रास्ताविक, तर कार्यकारी संचालक महेश जोशी यांनी आभार मानले.
दरम्यान, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम व इंडियन आॅईल कॉर्पोरेशनला इथेनॉल पुरवठा करणाऱ्या टँकरचे पूजन केले. शेतकरी संघाचे अध्यक्ष युवराज पाटील, अबिद मुश्रीफ, सूर्याजी घोरपडे, ‘पंजाब नॅशनल’चे सौरभ कुमार, युनियन बँक आॅफ इंडियाचे शंभव चटोपाध्याय, जांगले, बँक आॅफ इंडियाचे बेहरा, बँक आॅफ महाराष्ट्राच्या बोरगावे, आदी उपस्थित होते.
शेअर्स वाटप ३१ मार्चपर्यंत
कारखान्याच्यावतीने ३१ मार्चपर्यंत शेअर्स वाटप करण्यात येणार असून, ३१ मार्चपूर्वी शेअर्स खरेदी केलेल्यांनाच एक फेब्रुवारीपासून साखर वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली.