कुडित्रेत धार्मिक कारणावरून जातीय तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 10:40 AM2019-09-17T10:40:44+5:302019-09-17T10:42:18+5:30
कुडित्रे (ता. करवीर) येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या घटनेमुळे दोन समाजात जातीय तणाव निर्माण झाला. सोमवारी सायंकाळी हा तणाव वाढल्याने करवीर पोलिसांनी घटनास्थळावर येऊन तीन तरुणांना ताब्यात घेतले व पोलीस ठाण्यात नेले. दरम्यान, गावातील अनेक तरुण मिळेल त्या वाहनाने करवीर पोलीस ठाण्याकडे गेले.
कोपार्डे : कुडित्रे (ता. करवीर) येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या घटनेमुळे दोन समाजात जातीय तणाव निर्माण झाला. सोमवारी सायंकाळी हा तणाव वाढल्याने करवीर पोलिसांनी घटनास्थळावर येऊन तीन तरुणांना ताब्यात घेतले व पोलीस ठाण्यात नेले. दरम्यान, गावातील अनेक तरुण मिळेल त्या वाहनाने करवीर पोलीस ठाण्याकडे गेले.
घटनास्थळावरून व ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार दोन दिवसांपूर्वी कुडित्रे गावातील काही तरुणांना नदीच्या पुराच्या पाण्यात विसर्जन केलेल्या मूर्ती सध्या पाणी कमी झाल्याने उघड्यावर पडलेल्या दिसल्या. त्यांनी या मूर्ती गावच्या स्मशानशेडमध्ये आणून ठेवल्याचे गावातीलच काही तरुणांना दिसले. यामुळे एका समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यातून वाद सुरू झाला.
ग्रामस्थ ग्रामपंचायतीमध्ये एकत्र जमा झाले. या तरुणांना शिक्षा करा, अशी मागणी ग्रामपंचायतीकडे केली. दोन दिवसांपूर्वी सरपंच सरदार पाटील यांनी या तरुणांना व पालकांना ग्रामपंचायतमध्ये बोलावून गैर कृत्याबद्दल माफी मागण्यासाठी सांगितले. यावेळी ग्रामस्थांनी या तरुणांना गावात दोन दिवस स्वच्छता करा, अशी शिक्षा सुचविली. या तरुणांनी ती मान्य केली व प्रकरणावर पडदा पडला.
या तरुणांनी व कुटुबीयांनी दुसऱ्या दिवशी स्वच्छतेचे काम न करता ग्रामस्थांशी असभ्य भाषा वापरल्याचे एका समाजाचे म्हणणे आहे; त्यामुळे पुन्हा गावातील वातावरण चिघळले. सोमवारी सकाळपासून गावात दोन समाजात थोडा तणाव निर्माण झाला. सायंकाळी पाचनंतर गावातील तरुण ग्रामपंचायतीसमोर जमा होऊ लागले.
या प्रकरणाची मोठी चर्चा परिसरात पसरली. वातावरण तणावपूर्ण होऊ लागले. याची माहिती पोलिसांना निनावी फोनद्वारे मिळताच करवीरचे पोलीस पथक गावात दाखल झाले. यावेळी पोलिसांनी शांततेचे आवाहन करत तेढ निर्माण करणाऱ्या तीन तरुणांना ताब्यात घेतले. हे समजताच गावातील संतप्त तरुणांनी मोटारसायकल व टेम्पोतून करवीर पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. या धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या तरुणांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली.