मूल्यांकन समिती आज शहरात
By admin | Published: July 24, 2014 12:15 AM2014-07-24T00:15:54+5:302014-07-24T00:18:28+5:30
रस्ते विकास प्रकल्प : आयआरबीच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करणार
कोल्हापूर : शहरातील रस्ते विकास प्रकल्पाचे मूल्यांकन करण्यासाठी राज्य सरकारने नियुक्त केलेली तज्ज्ञांची समिती उद्या, गुरुवारी कोल्हापुरात येणार असून प्रत्यक्ष रस्त्यांच्या कामाची पाहणी करणार आहे. यापूर्वी एकदाच या समितीने कोल्हापुरात येऊन रस्ते विकास प्रकल्पाबाबत महानगरपालिका अधिकारी, सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समिती सदस्य तसेच आर्किटेक्टस् असोसिएशनचे सदस्य यांच्याकडून माहिती घेतली होती.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आदेशावरून रस्ते विकास महामंडळाने नियुक्त केलेली समितीच रस्त्यांचे मूल्यांकन करणार असली, तरी या समितीने रस्त्यांच्या सर्वेक्षणाचे काम मात्र त्यांच्या सहकाऱ्यांकडून करून घेतले आहे. जवळपास ४५ किलोमीटरपर्यंत हे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामही लवकरच पूर्ण होईल, असे सांगण्यात आले.
रस्ते विकास महामंडळाच्या अभियंत्यांनी १० जुलैपासून २१ जुलैपर्यंत ‘रोड लेव्हल व बिटल्स सर्व्हे’ (सर्वंकष सर्वेक्षण)द्वारे पूर्ण केला आहे. यामध्ये पदपथ, रस्त्याची उंची (प्लिंथ लेव्हल), डांबरी व सिमेंटच्या रस्त्यांची समानता, दोन्ही बाजूंची रुंदी, दर्जा, आदी तपासणी करण्यात आली. टोल आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने प्रकल्पाची किंमत ठरवा ती भागविण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगितले असल्यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आदेशानुसार समितीने हे मूल्यांकनाचे काम सुरू केले आहे.
या समितीचे प्रमुख के. व्ही. कृष्णराव हे असून, उदय खैराटकर व राजीव श्रीखंडे हे सदस्य आहेत. उद्या, गुरुवारी हे सदस्य प्रत्यक्ष कोल्हापूर शहरात ‘आयआरबी’ने केलेल्या रस्त्यांवर उतरून झालेल्या कामांची, अपूर्ण कामांची स्वत: पाहणी करणार आहेत. त्यानंतर अहवाल तयार करण्यासाठी डाटा तयार केला जाईल. डाटा तयार करणे, मूल्यांकनाचा अहवाल तयार करणे, या गोष्टीला आणखी किमान पंधरा दिवस लागतील.