जानेवारी उजाडला तरी महसूल वसुली ५८ टक्क्यांवरच, महापुराचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 05:45 PM2020-01-11T17:45:10+5:302020-01-11T17:57:37+5:30
महापुराचा फटका जिल्ह्यातील महसूल वसुलीलाही बसला आहे. कारण जानेवारीत ८० टक्के वसुली अपेक्षित असताना आतापर्यंत फक्त ५८.२९ टक्के इतकेच उद्दिष्ट साध्य झाले आहे. उद्दिष्ट पूर्तीसाठी अवघे दोन महिने शिल्लक राहिल्याने प्रशासकीय यंत्रणेची पळापळ सुरू झाली आहे. सर्व नायब तहसीलदार व वसुली लिपिकांना याबाबत जिल्हाप्रशासनाकडून सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.
प्रवीण देसाई
कोल्हापूर : महापुराचा फटका जिल्ह्यातील महसूल वसुलीलाही बसला आहे. कारण जानेवारीत ८० टक्के वसुली अपेक्षित असताना आतापर्यंत फक्त ५८.२९ टक्के इतकेच उद्दिष्ट साध्य झाले आहे. उद्दिष्ट पूर्तीसाठी अवघे दोन महिने शिल्लक राहिल्याने प्रशासकीय यंत्रणेची पळापळ सुरू झाली आहे. सर्व नायब तहसीलदार व वसुली लिपिकांना याबाबत जिल्हाप्रशासनाकडून सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.
एप्रिल २०१९ ते मार्च २०२० या चालू आर्थिक वर्षासाठी राज्य सरकारने कोल्हापूर जिल्ह्यासाठी एकूण ८५ कोटी ५८ लाख रुपयांचे महसूल वसुलीचे उद्दिष्ट दिले आहे. यामध्ये जमीन महसूल व गौण खनिज (वाळू, मुरूम) महसूल वसुलीचा समावेश आहे. त्यानुसार गेल्या नऊ महिन्यांत ३१ डिसेंबरपर्यंत ४९ कोटी ५५ लाख ३९ हजार म्हणजे ५५.२८ टक्के इतकी वसुली झाली आहे. वास्तविक डिसेंबरपर्यंत ७० टक्के व जानेवारीपर्यंत ८० टक्के वसुली होणे अपेक्षित आहे. आतापर्यंत जिल्हा प्रशासनाने ते साध्य केले आहे.
परंतु जुलै, आॅगस्ट महिन्यांतील महापूर व आॅक्टोबर महिन्यातील अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा फटका वसुलीला बसला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाल्याने शासनस्तरावरूनही जादा सक्ती करण्यात आलेली नाही; परंतु जिल्हा प्रशासनाकडून वसुलीसंदर्भात जिल्हापातळीवर दररोज आढावा घेतला जात आहे. प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असले तरी सध्याची परिस्थिती पाहता पुढील दोन महिन्यांत ही उद्दिष्टपूर्ती होते का? हे पाहावे लागणार आहे.
आजरा तालुक्याने १०६ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले
आजरा तालुक्याने डिसेंबर महिन्यातच आपले एकूण १00 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. या तालुक्याची उद्दिष्टपूर्ती १०६ टक्के इतकी झाली असून, डिसेंबरमध्येच शंभरी गाठणे हे एकमेव आजरा तालुक्यालाच शक्य झाले आहे.
१५ मार्चपर्यंत उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश
अपेक्षित उद्दिष्टपूर्ती न झाल्याने नुकतीच उपजिल्हाधिकारी (महसूल) श्रावण क्षीरसागर यांनी सर्व तालुक्यांतील नायब तहसीलदार व वसुली लिपिकांची बैठक घेऊन आढावा घेतला. त्यांना १५ मार्चपर्यंत कोणत्याही परिस्थितीत शंभर टक्के वसुली झाली पाहिजे, अशा सक्त सूचना दिल्या आहेत. इथून पुढे दररोज आढावा घेतला जाईल, असेही त्यांना सांगण्यात आले आहे.
तालुकानिहाय एकूण उद्दिष्ट व वसुली (डिसेंबर २०१९अखेर)
तालुका एकूण उद्दिष्ट वसुली टक्केवारी
करवीर २५ कोटी ६१ लाख ६२ हजार ८ कोटी ८३ लाख ९८ हजार ३४.५१
गगनबावडा १ कोटी ५० लाख ४४ लाख ८३ हजार २९.८९
कागल ६ कोटी ५० लाख ४ कोटी ९० लाख ११ हजार ७४.५०
राधानगरी ३ कोटी ४५ लाख २ कोटी २६ लाख ३३ हजार ६५.६०
पन्हाळा ५ कोटी २५ लाख १ कोटी ६१ लाख ९ हजार ३०.६८
शाहूवाडी ३ कोटी ५१ लाख २ कोटी ३९ लाख ८६ हजार ६८.२५
भुदरगड ४ कोटी २५लाख २ कोटी ५९ लाख ५२ हजार ६१.०६
आजरा ४ कोटी २५लाख ४ कोटी ७० लाख २६ हजार ११.६५
हातकणंगले २१ कोटी ५६ लाख ९१ हजार ५ कोटी ९८ लाख १ हजार २७.७३
शिरोळ ११ कोटी ५० लाख ६ कोटी ५१ लाख ७ हजार ५६.६०
गडहिंग्लज ६ कोटी ५० लाख ३ कोटी २३ लाख ७२ हजार ४९.७३
चंदगड ४ कोटी ५० लाख ३ कोटी ९ लाख ८६ हजार ६८.८३