मरण दारात आले तरी वाढती बेफिकिरी..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:24 AM2021-04-20T04:24:22+5:302021-04-20T04:24:22+5:30
कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे, रविवारी शहरात २२८ तर जिल्ह्यात ५९४ ...
कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे, रविवारी शहरात २२८ तर जिल्ह्यात ५९४ रुग्ण नव्याने आढळून आले. मरण दारात आले तरी कोल्हापूरच्या जनतेत कोरोनाविषयी भीती नसल्याचे दिसून येत आहे. नागरिक आणि प्रशासन अशा दोन्ही स्तरावर प्रचंड हलगर्जी दिसून येत आहे. सोमवारी काेल्हापुरात ‘संचार’ रस्त्यावर आणि ‘बंदी’ कागदावर अशी स्थिती दिसून आली.
कोल्हापूर शहरात रविवारी बऱ्यापैकी वर्दळ कमी होती. परंतु सोमवारी पुन्हा चित्र वेगळे दिसले. सर्वच रस्त्यावर वाहनांची वर्दळ, नागरिकांचा खुलेपणाने होणारा संचार, दुकानांच्या दारात झालेली गर्दी, रिक्षा वाहतूक सुरू, फेरीवाल्यांची रेलचेल, अत्यावश्यक सेवेतील गर्दीत हरविल्याचे जाणवत होते. रस्त्यावरील सिग्नल बंद असले तरी चार चाकी वाहनांची ये-जा सुरूच होती. रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या संख्येने अशा वाहनांचे पार्किग होते. अत्यावश्यक सेवेत न मोडणाऱ्या अस्थापना सुरू होत्या. नागरिकांचाही तिथे राबता होता.
बिंदू चौक, दसरा चौक आणि रंकाळा टॉवर येथेच काय तो बंदोबस्त पाहायला मिळाला. पोलीस रस्त्यावर नाहीत आणि कोणी अडवत नाहीत हा संदेश घरोघरी पोहोचल्यामुळे शहरातील संचार अगदीच मुक्त झाला. पार्सलच्या नावावर काही रेस्टॉरंट, हॉटेल आतील बाजूने सुरू होती. चहाच्या गाड्या, वडाभजी विक्री करणाऱ्या हातगाड्या सुरू होत्या. तेथील गर्दीही नजरेत भरत होती.
रविवारी कपिलतीर्थ व लक्ष्मीपुरी भाजी मंडईत काही विक्रेते, भाजी खरेदीला आलेले नागरिक कोरोना बाधित आढळले असतानाही नागरिकांनी भाजी खरेदीला गर्दी केली होती. मोठ्या संख्येने भाजी मंडईत कोरोनाबाधित आढळल्यानंतर तेथील नागरिकांची गर्दी आपोआप कमी होईल, असे वाटत होते. मात्र चित्र यापेक्षा वेगळे होते. भाजी न्यायला लोक मंडईत गेलेच होते.
भाजी मंडईत आता सोशल डिस्टन्स -
महानगरपालिका अतिक्रमण निर्मूलन पथक आणि इस्टेट विभाग यांनी संयुक्तपणे सोमवारी भाजी विक्रेत्यांना थोडी शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. ऋणमुक्तेश्वर मंडईतील सर्वच भाजी विक्रेत्यांना पंचगंगा नदी घाटावर बसण्यास जागा देण्यात आली. लक्ष्मीपुरीतील भाजी विक्रेत्यांची गर्दी कमी करण्याकरिता काही विक्रेत्यांना मुख्य रस्त्यावर बसण्यास परवानगी दिली. कपिलतीर्थ मंडईतील विक्रेत्यांनी सोमवारी अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख पंडित पोवार यांच्या उपस्थितीत सकाळी बैठक घेऊन ५०-५० टक्के विक्रेते दोन दिवसांच्या आळीपाळीने बसण्याचा निर्णय घेतला. मंडईतील निम्म्या विक्रेत्यांनी दोन दिवस आणि निम्म्या विक्रेत्यांनी त्यानंतरचे दोन दिवस व्यवसाय करायचा आहे.
-उपनगरातही शिस्त लावणार-
शहराच्या उपनगर भागातील विक्रेत्यांना शिस्त लावण्यात येणार आहे. रायगड कॉलनी येथील विक्रेत्यांची गर्दी कमी करून त्यांना कळंबा जेल ते हॉकी स्टेडियम रस्त्यावर बसविण्यात येणार आहे. क्रांतिसिंह नाना पाटील नगरातील भाजी मंडई रिंगरोडवर आणली जाणार आहे. सर्वांचा सोशल डिस्टन्सचा नियम पाळावा लागणार आहे.
फोटो - कोल्हापूर सिटी बंद या नावाने.