लोकसभा-विधानसभा एकत्रित झाल्या तरी तयार, मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडेंनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2023 11:27 AM2023-05-13T11:27:00+5:302023-05-13T11:27:40+5:30

मतदार याद्या अद्ययावत करणे, ईव्हीएम मशीनचे गोडावून, स्ट्राँग रुम, मतदान केंद्रे, मतमोजणी केंद्रांचे नियोजन करण्याची सूचना

Even if the Lok Sabha and Vidhan Sabha are combined, ready, Chief Election Officer Shrikant Deshpande informed | लोकसभा-विधानसभा एकत्रित झाल्या तरी तयार, मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडेंनी दिली माहिती

लोकसभा-विधानसभा एकत्रित झाल्या तरी तयार, मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडेंनी दिली माहिती

googlenewsNext

कोल्हापूर : येणारा काळ निवडणुकांचा आहे. लोकसभा एप्रिल-मेमध्ये व विधानसभेची निवडणूक ऑक्टोबर २०२४ मध्ये होण्याची शक्यता आहे किंवा दोन्ही निवडणुका एकदम झाल्या तरी निवडणूक विभागाची तयारी पूर्ण झालेली असेल. त्यासाठी मतदार याद्या अद्ययावत करणे, ईव्हीएम मशीनचे गोडावून, स्ट्राँग रुम, मतदान केंद्रे, मतमोजणी केंद्रांचे नियोजन करण्याची सूचना दिल्याची माहिती अप्पर मुख्य सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी शुक्रवारी पत्रकारांना दिली.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक तसेच सर्व विभागांच्या तयारीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ताराराणी सभागृहात झाली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे उपस्थित होते.

श्रीकांत देशपांडे म्हणाले, लोकसभा विधानसभेच्या निवडणुका वेगवेगळ्या किंवा एकत्रित झाल्या तरी विभागाला त्याची तयारी आताच सुरू करावी लागणार आहे. निवडणूका सुरळीत पार पाडणे ही फार मोठी प्रक्रिया असते. त्यात सर्वात महत्वाचा भाग हा शुद्ध मतदार याद्यांचा असतो. त्यामुळे मतदार याद्या तपासा, मयत, स्थलांतरीत व्यक्तींची नावे वगळा, नवमतदारांना सहभागी करून घ्या अशा सूचना दिल्या आहेत.

मतदान केंद्रांना भेट देऊन तेथे पाणी, स्वच्छतागृह, दिव्यांगांसाठी रॅम्पची सुविधा आहे का याची खात्री करा, असतील तर त्यांची दुरुस्ती, नसतील तर सुविधा निर्माण करा. मतदान केंद्र बदलता येईल का याचा विचार करण्यास सांगितले आहे. मतदारांना येथील अनुभव सुखकारक ठरावा असा आमचा प्रयत्न आहे.

मृत-स्थलांतरितांचे प्रमाण ३० टक्क्यांपर्यंत

देशपांडे म्हणाले, विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात मृत व स्थलांतरितांचे प्रमाण २० ते ३० टक्क्यांवर आहे. त्यामुळे येथे मतदार याद्यांचे मोठ्या प्रमाणात शुद्धिकरण करण्याची गरज आहे. कोल्हापुरात मात्र ८० वर्षांवरील व्यक्तींचे प्रमाण १५ ते २० टक्के आहे. ज्यांची छायाचित्रे चांगली नाहीत त्यातील १० टक्के लोक मृत व स्थलांतरित आहेत. ही आकडेवारी पाहता जिल्ह्यात १० ते १५ टक्के मतदारांची नावे वगळली जातील.

आधार लिंकिंगचे प्रमाण ४५ टक्के

मतदान कार्डाला आधार लिंकिंगची राज्यव्यापी मोहिम ४५ टक्के पूर्ण झाली असून कोल्हापुरात हे प्रमाण ६५ टक्के आहे. शंभर टक्के लिंकिंगसाठी आणखी एक वर्षाची मुदत आहे. निवडणूक आयोग व आधारकार्ड व्यवस्थापन यांच्यामध्ये सामंजस्य करार होऊन लिंकिंग झाले तर मतदाराचा मोबाईल नंबरदेखील डेटाबेसमध्ये येतील. त्यामुळे निवडणुकीचे वेळापत्रक, मतदार यादी, मतदान केंद्राची माहिती एका मेसेजद्वारे देता येणार आहे.
 

Web Title: Even if the Lok Sabha and Vidhan Sabha are combined, ready, Chief Election Officer Shrikant Deshpande informed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.