युवकांना लस नाही तरीही मोदींचे आभार मानणारे बॅनर्स लावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:17 AM2021-07-01T04:17:40+5:302021-07-01T04:17:40+5:30
कोल्हापूर : विद्यापीठ अनुदान आयोगाकडून महाविद्यालये, सर्व विद्यापीठ व शिक्षण संस्थांना मोफत लसीकरणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार माना, ...
कोल्हापूर : विद्यापीठ अनुदान आयोगाकडून महाविद्यालये, सर्व विद्यापीठ व शिक्षण संस्थांना मोफत लसीकरणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार माना, असे अजब निर्देश देण्यात आले आहेत. या निर्देशांचा कोल्हापूर युवक काँग्रेस निषेध केला असून महाविद्यालयांना बॅनर्स लावण्याचे दिलेले आदेश म्हणजे हा संघी फॅसिझमचा प्रकार असल्याची टीका युवक काँग्रेसच्या अभिषेक मिठारी यांनी केली आहे.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मोफत लसीकरणाबद्दल आभार माना व त्यासंबंधीचे बॅनर्स लावा’, असे यूजीसीकडून सांगण्यात आले आहे. याबाबतचा अधिकृत मेल विद्यापीठ अनुदान आयोगाने सर्व विद्यापीठांना पाठवला आहे. आभार मानण्यासाठी बॅनर्स आणि होर्डिंगच्या डिझाइन्ससह हिंदी आणि इंग्रजी भाषेतील मजकूरदेखील यूजीसीकडून विद्यापीठांना पाठवण्यात आला आहे.
१८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण २१ जूनपासून केंद्र सरकारने सुरू केले आहे. यासंदर्भात केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयामार्फत पाठवण्यात आलेल्या डिझाईननुसार बॅनर्स, होर्डिंग्ज आणि पोस्टर्स महाविद्यालये, विद्यापीठे आणि शिक्षण संस्थांमध्ये लावण्यात यावेत, असे या निर्देशात नमूद करण्यात आले आहे.
शैक्षणिक क्षेत्रातील इतर प्रश्नांकडे विद्यापीठ अनुदान आयोग गांभीर्याने पाहत नसून, महाविद्यालये ऑनलाईन पद्धतीने सुरू आहेत, अशा स्थितीत देखील जाहिरातबाजी चालू आहे. देशभरातील विद्यार्थ्यांचे इतर प्रश्न प्रलंबित असून केंद्र सरकार त्यांच्याकडे गांभीर्याने न पाहता सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने नाईलाजास्तव मोफत लसीकरण करावे लागलेल्या सरकारने स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घेणे ही लोकशाहीसाठी मोठी शोकांतिका आहे, असे पत्रकात म्हटले आहे.
सरकारवर उपकार म्हणायचे का...
नि:शुल्क लसीकरण ही सरकारची जबाबदारी आहे. मग त्यासाठी बॅनर्स लावून पंतप्रधानांचे आभार का मानायचे? मोफत लसीकरण करून सरकार देशातील नागरिकांवर उपकार करत नाही. या जाहिरातबाजीसाठी विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांना कोरोना काळात निधी खर्च करायला लावणे चुकीचे आहे, असेही युवक काँग्रेसने म्हटले आहे.