कोल्हापूरमध्ये दोन हजार कोटींचे व्यवहार ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 05:01 PM2020-01-31T17:01:24+5:302020-01-31T17:04:54+5:30
कोल्हापूर : गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असणारा वेतन वाढीचा करार तातडीने करावा, या व इतर मागण्यांसाठी सरकारी बँकेतील कर्मचाऱ्यांनी ...
कोल्हापूर : गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असणारा वेतन वाढीचा करार तातडीने करावा, या व इतर मागण्यांसाठी सरकारी बँकेतील कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपासून देशव्यापी बंद पुकारला आहे. कोल्हापुरातील कर्मचाऱ्यांनी लक्ष्मीपुरी येथील बँक आॅफ इंडियाच्या शाखेसमोर सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली. दोन दिवस बँका बंद राहिल्याने सुमारे दोन हजार कोटींचे व्यवहार ठप्प झाले.
सरकारी बँकेतील विविध मागण्यांसाठी कर्मचा-यांनी दोन दिवस ‘काम बंद’ची हाक दिली होती. यासंदर्भात गुरुवारी (दि. ३0) ‘यूएफबीयू’चे प्रतिनिधी व इंडियन बँक असोसिएशन यांच्या झालेली चर्चा विफल ठरली. त्यामुळे शुक्रवारपासून सर्व कर्मचारी दोन दिवसांच्या संपावर गेले. युनायटेड फोरम आॅफ बँक युनियनच्यावतीने कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी येथील बँक आॅफ इंडियाच्या शाखेसमोर सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली.
यावेळी मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते. सुहास शिंदे, पांडुरंग वार्इंगडे, रमेश मोहिते, परेश हटकर, निखिल कुलकर्णी, तेजस्वीनी पाटील, रमेश कांबळे, सूर्यकांत कर्णिक, प्रफुल्ल जाधव, नारायण साळुंखे यांनी सरकारच्या विरोधात तोफ डागली. संपामुळे बँकिंग व्यवहार ठप्प झाले आहेत. क्लिअरिंग बंद झाले असून, एटीएममधील कॅश संपल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे.
------------------------------
जिल्हाधिका-यांना आज भेटणार
आज, शनिवारीही संप सुरूच राहणार आहे. लक्ष्मीपुरी येथे सर्व कर्मचारी पुन्हा निदर्शने करणार आहेत. दुपारी १२ वाजता मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना देणार आहेत. दरम्यान, प्रत्येक शाखेतून केंद्रीय वित्त मंत्र्यांना ई-मेलने मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले.
---------------------------
प्रमुख मागण्या
- - रखडलेला २0 टक्के वेतन वाढीचा करार तत्काळ करावा.
- - थकीत कर्ज वसुलीसाठी कठोर कायदे करावेत.
- - इतर सरकारी कार्यालयाप्रमाणे पाच दिवसांचा आठवडा करावा.
- - नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी.
- - बँक कर्मचा-यांच्या कामाचे तास निश्चित करावेत.
- - रिक्त जागांवर भरती करावी.