बोटांचे ठसे न उठणाऱ्यांनाही आता मिळणार रेशनचे धान्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 04:07 PM2024-05-25T16:07:36+5:302024-05-25T16:08:29+5:30

कोल्हापुरातील रेशन धान्य दुकानदारांना फोरजी ई पॉस मशीन वाटपास सुरुवात

Even those who do not get their fingerprints will now get ration grains | बोटांचे ठसे न उठणाऱ्यांनाही आता मिळणार रेशनचे धान्य

बोटांचे ठसे न उठणाऱ्यांनाही आता मिळणार रेशनचे धान्य

कोल्हापूर : रेशन दुकानातील पॉश मशीनवर बोटांचे ठसे न उठणाऱ्यांनाही धान्य मिळण्यासाठी आय स्कॅनरसह फोरजी पॉश मशीन वाटपास शुक्रवारी सुरुवात झाली. शहरातील स्वस्त धान्य दुकानदारांना जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्याहस्ते मशीनचे वाटप झाले. आज, शनिवारपासून जिल्ह्यातील सर्व दुकानदारांना मशीन वाटपाला सुरुवात होणार आहे.

३१ मे अखेर जिल्ह्यातील सर्व १६७२ रेशन दुकानदारांना मोफत मशीन देण्यात येणार आहे. यामुळे जून महिन्यातील धान्य नव्या मशीनमधून होणार आहे. मशीनवर बोटाचे ठसे आले नाहीत तर आय स्कॅनरवरून धान्य वाटप करण्यात येणार आहे.

स्वस्त धान्य दुकानातून दर महिन्याला धान्य घेण्यासाठी पॉश मशीनवर थंब करणे बंधनकारक आहे. धान्य वितरण व्यवस्थेत पारदर्शकतेसाठी ही पध्दती कार्यान्वित आहे. पण हाताने कष्टाची कामे केल्याने काही महिला व पुरुषांच्या हाताचे ठसे नाहीसे झाल्याने मशीनवर ठसे उमटत नसत. परिणामी त्यांना धान्यापासून वंचित राहावे लागत होते. म्हणून शासनाने फोरजी आयस्कॅनरसही ई पॉश मशीन देत आहे. त्याचे वितरण सुरू झाले.

जिल्हा पुरवठा कार्यालयात झालेल्या नवीन मशीन वितरणाच्या कार्यक्रमास जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण, जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार संघटना अध्यक्ष रवींद्र मोरे, जिल्हा तांत्रिक विभागाचे कर्मचारी करण गायकवाड, सुहास पाटील, विठ्ठल गायकवाड, सुभाष जाधव किरण गाडे, माणिक भालेकर, सुमित पवार उपस्थित होते.

दरम्यान, आज शनिवारी करवीर, गडहिंग्लज, रविवारी पन्हाळा, आजरा, सोमवारी हातकणंगले, भुदरगड, मंगळवारी इचलकरंजी, राधानगरी, बुधवारी शिरोळ, कागल तर गुरुवारी गगनबावडा तालुक्यातील रेशन धान्य दुकानदारांना मशीनचे वाटप करण्यात येणार आहे.

Web Title: Even those who do not get their fingerprints will now get ration grains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.