Kolhapur Flood: एका पायाने अपंग, पुरात राहून कुत्र्या-मांजरांना पोटाशी धरणारा महेश तात्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 01:35 PM2024-07-30T13:35:22+5:302024-07-30T13:46:59+5:30
छत्रपती घराण्याची सेवा करतोय याचा अभिमान
आदित्य वेल्हाळ
कोल्हापूर : अविरतपणे कोसळणारा भयंकर पाऊस, वारा, वाढतच राहणारा पाऊस अशा अवस्थतेत सजीव-निर्जीवांना पंचगंगेने कवेत घेतलंय. या पंचगंगेच्या डोहात एक मंदिर आहे. या छत्रपती घराण्याच्या मंदिराचा सेवक महेश भालेरे तिथे राहतात. पुरात सुद्धा त्यांनी घर सोडले नसल्याचे रविवारी प्रत्यक्ष भेटीत दिसले.
महेश तात्यांना रोज जेवण घेऊन जाणाऱ्या धाडसी तरुणांबरोबर उत्सुकतेपोटी मी देखील तिथे गेलो. पाणी, जेवण, बिस्किटं, व दूध घेऊन छोट्याशा होडीतून आम्ही मंदिर परिसरात पोहोचलो. नदीपात्र व रस्त्यापासून २५ ते ३० फूट उंच असणाऱ्या खोलीजवळ आम्ही होडीतून जाताना पाण्याचा प्रवाह होडीला फिरवत होता. सापांनी होडीच्या बाजूने सळसळत जाऊन येथील परिस्थिती किती भयंकर आहे याची जाणीव करून दिली. मंदिराच्या पूर्वेकडील उंच खोलीत होडीतूनच आम्ही प्रवेश केला, खोलीत गुडघ्याच्यावर पाणी होते. त्या अंधाऱ्या खोलीत मंदिराचे सर्व साहित्य कट्ट्यावर ठेवलेले मिणमिणत्या दिव्याच्या प्रकाशात महेश तात्या कट्ट्यावर बसून १० ते १५ मांजराच्या व ५ कुत्र्यांच्या पिलांना स्वत: गळाने पकडलेले मासे खाऊ घालत होते. हे सगळं चित्र एखाद्या परदेशी चित्रपटात दाखविल्या जाणाऱ्या देखाव्यासारख होतं.
मी म्हटलं कशाला इथं राहता निवारा केंद्रात चला.!' यावर तात्या म्हणाले, आतापर्यंत '१९८९ पासूनचे पूर येथेच राहून पाहिलेत. जेव्हा २०२१ला जास्त पाणी आले त्यावेळी निवारा केंद्रात आलो. पण त्यामुळे इथल्या प्राण्यांची खूप वाताहत झाली. ही मांजरं, कुत्र्यांची पिलं लोकं नदीवर आणून सोडतात. ती मोठ्या कुत्र्यांचं भक्ष्य होण्यापेक्षा त्यांना मी सांभाळतो. मुळात मी छत्रपती घराण्याचा सेवक. छत्रपती घराण्याची सेवा करण्यात मला अभिमान वाटतो. म्हणून येथील सर्व मंदिराची स्वच्छता व पूजा मी गेली ३० ते ३५ वर्षे करत आहे.
पूर्वी या कामाबरोबर मंदिरात अभ्यास करणाऱ्या तरुणांना पिण्यासाठी पाणी मी आणून देत असायचो. पण आता मंदिर लॉकडाऊनपासून बंद आहे. म्हणून येथील साहित्याची निगा मंदिराची जबाबदारी व या प्राण्यांची सेवा हाच माझा धर्म आहे. ही पोरं मदत करतात मला, हे खूपच आहे माझ्यासाठी.' एवढं बोलून तात्या काही वेळ स्तब्ध झाले आणि 'आता पाणी ओसरू लागलंय, या आता; तुम्ही निघा म्हणत ते आपल्या मुक्या प्राण्यांची सेवा करण्यात व्यस्त झाले. तात्यांचा निरोप घेऊन आम्ही मंदिरातून बाहेर पडलो पण डोक्यातील विचारांचं मंदिर मात्र महेश तात्यानं उघडलं होतं.
वेडेपण..
एका पायाने अपंग असणारे महेश तात्या हा माणूस वेडा आहे, अशी परिस्थिती लोकांसमोर असताना; छत्रपती घराण्यासाठी असणारी सेवा वृत्ती व मुक्या प्राण्यांसाठीची असणारी भुतदया इतक्या पुरात तसूभरही त्यांनी कमी होऊ दिलेली नाही.
तरुणांचेही कौतुकच..
छत्रपती ट्रस्टकडून मिळणाऱ्या मानधनावर सेवा करणाऱ्या या अवलिया माणसाची ट्रस्टने व कोल्हापूरकरांनी दखल घेतली पाहिजे व या दिवसात महेश तात्यांच्या प्रेमापोटी रोज धाडसी प्रवास करून जेवण व प्राण्यांना दूध घेऊन जाणाऱ्या रोहित माने, सोहन साळोखे व मयूर बुधले या तरुणांचे कौतुक करायलाच हवे.