वस्त्रनगरीत आजही बेंदराचा उत्साह
By admin | Published: June 20, 2016 12:56 AM2016-06-20T00:56:32+5:302016-06-20T00:56:32+5:30
परंपरा जपली : जिम्नॅशियम मैदानावर धष्टपुष्ट बैलांच्या स्पर्धांना हजारो प्रेक्षकांची उपस्थिती
राजाराम पाटील ल्ल इचलकरंजी
इचलकरंजी औद्योगिक नगरी असली तरी येथे अजूनही शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. त्याचबरोबर शहराच्या पूर्व-दक्षिण परिसरामध्ये अद्याप ग्रामीण संस्कृती जपली आहे. त्यामुळेच उद्या, मंगळवारी साजरा होणाऱ्या कर्नाटकी बेंदूर सणासाठीचा उत्साह शेतकरी वर्गामध्ये दिसू लागला आहे. बैल हे तरुण व बालवर्गाचे आकर्षण असल्याने युवक वर्ग बैलांची शिंगे रंगविण्यात आणि आकर्षक झुल, शिंगांचे गोंडे जमा करीत आहेत. अशा पार्श्वभूमीवर रविवारी सकाळी येथील जिम्नॅशियम मैदानावर पार पडलेल्या आकर्षक व धष्टपुष्ट बैलांच्या स्पर्धांना हजारोंच्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते.
इचलकरंजी सुदृढ बैल, वासरे आणि गायी यांच्या स्पर्धांना संस्थानकालीन इतिहास आहे. श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे-जहागीरदार यांनी शतकापूर्वी अशा स्पर्धा येथे सुरू केल्या. शेतीच्या मशागतीसाठी वापरल्या जाणाऱ्या बैलांची निगा राखण्यात यावी आणि त्यांच्या पालनपोषणावर शेतकऱ्यांनी लक्ष द्यावे, यासाठी सुदृढ बैल, वासरे, गायी, आदींच्या स्पर्धा जहागीरदार घेत होते. त्यामध्ये यशस्वी होणाऱ्या जनावराला बक्षिसेही दिली जात.
त्याचवेळी जहागीरदार श्रीमंत ना. बा. घोरपडे यांनी बैलाने लाकूड ओढण्याच्या शर्यतीसुद्धा सुरू केल्या होत्या. साधारणत: ४० वर्षांपूर्वी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या नेतृत्वाखाली इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाने बैलाने लाकूड ओढण्याच्या शर्यती व सुदृढ जनावरांचे प्रदर्शन यासाठी चांगल्या भरीव निधीची तरतूद केली. अगदी स्पर्धेत यशस्वी बैलाला किंवा बैलजोडीला चांदीचे तोडे दिले जायचे. आज इचलकरंजीच्या गावभाग, जुना चंदूर रस्ता, आमराई, बी. पा. पाटील मळा, शहापूर, विक्रमनगर या परिसरांमध्ये शेतकरी कुटुंबे मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे कर्नाटकी बेंदराचा उत्साह अद्यापही वस्त्रनगरीत आहे. (प्रतिनिधी)