यंदाही गणेशोत्सवाच्या मिरवणुका नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:16 AM2021-07-02T04:16:32+5:302021-07-02T04:16:32+5:30
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने गुरुवारी गणेशोत्सवासंबंधी नियम जाहीर केले असून घरगुती गणेशमूर्तींना दोन फुटांची व सार्वजनिक मंडळांच्या ...
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने गुरुवारी गणेशोत्सवासंबंधी नियम जाहीर केले असून घरगुती गणेशमूर्तींना दोन फुटांची व सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींना दोन फुट उंचीची मर्यादा घालून दिली आहे. आगमन व विसर्जन मिरवणुका काढू नयेत व कोरोना नियमांचे पालन करत व साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे.
राज्य शासनाने दोन दिवसांपूर्वी गणेशोत्सवासंबंधी नियमावली जाहीर केल्यानंतर गुरुवारी जिल्ह्यासाठीच्या नियमांचा आदेश काढण्यात आला. त्यानुसार मंडळांनी नागरिकांना वर्गणी मागू नये, कोणी स्वेच्छेने दिली तर घ्यावी, सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडळांनी महापालिका व स्थानिक प्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. तसेच मांडव मर्यादित स्वरूपात उभारून सजावट करताना त्यात भपकेबाजी नसावी. मंडळांची गणेशमूर्ती ४ फुटांपर्यंतच असावी. मूर्ती शाडूची असल्यास त्याचे घरीच करावे. ते शक्य नसल्यास कृत्रिम कुंडात विसर्जन करण्यात यावे. आरोग्यविषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यात याव्यात. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य उपक्रम, शिबिरे घेवून त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू अशा आजारांबाबत जागृती करण्यात यावी. ब्रेक द चेन अंतर्गत सुरू असलेल्या नियमात गणेशोत्सवानिमित्त शिथिलता दिली जाणार नाही. आरती, भजन, कीर्तन व धार्मिक कार्यक्रम घेताना गर्दी तसेच ध्वनीप्रदूषण होणार नाही, याची काळजी घ्यावी असे आदेशात म्हटले आहे.
भक्तांच्या सोयीसाठी श्री गणेशाच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुकद्वारे करावी, मंडपांमध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था करा. भाविकांसाठी शारीरिक अंतर, मास्क,सॅनिटायझर हे नियमांचे पालन करण्यात यावे. श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी, अशा सूचनाही आदेशात देण्यात आल्या आहेत.
----
उंचीवर बंधने नकोत..
काही कुंभारांनी ४ फुटांवरील गणेशमूर्ती तयार केल्या आहेत, त्यामुळे मूर्तीच्या उंचीवर बंधने घालू नयेत, अशी मागणी कुंभार समाजाने केली होती. मात्र गेल्यावर्षी शासनाने हा नियम घालून दिला असून त्यात यंदादेखील बदल केेलेला नाही. त्यामुळे ज्यांनी जास्त उंचीच्या मूर्ती बनवल्या आहेत, त्यांना नुकसान सोसावे लागणार आहे.
--