राजर्षी शाहू ग्रंथ महोत्सवात कार्यक्रमांची रेलचेल
By admin | Published: February 10, 2015 11:11 PM2015-02-10T23:11:13+5:302015-02-10T23:53:02+5:30
शनिवारी उद्घाटन : सांस्कृतिक कार्यक्रम, माहितीपर स्लाईड शो, बालरंजन, कवी संमेलन
कोल्हापूर : राजर्षी शाहू ग्रंथ महोत्सव समितीच्यावतीने आयोजित सहावा राजर्षी शाहू ग्रंथ महोत्सव शनिवार (दि. १४) पासून सुरू होत असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या ग्रंथमहोत्सवाच्या निमित्ताने चार दिवस भरगच्च सांस्कृतिक व माहितीपर कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.
या ग्रंथ महोत्सवासाठी प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानाला ‘आद्यचरित्रकार कृष्णराव केळूसकर ग्रंथनगरी’ तर व्यासपीठाला ‘ज्ञानपीठ विजेते वि. स. खांडेकर’ हे नाव देण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होईल. तत्पूर्वी शहरातील प्रमुख मार्गांवरून ग्रंथदिंडी काढण्यात येईल.
चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विविध क्षेत्रांत उत्तुंग यश संपादन केलेल्या मान्यवरांच्या मुलाखती, शाळांचे सांस्कृतिक कार्यक्रम, माहितीपर स्लाईड शो, बालरंजन, गाण्यांची मैफल, कवि संमेलन असे विविध कार्यक्रम होणार आहेत. महोत्सवाचा समारोप मंगळवारी (दि. १७) दुपारी ३ वाजता होणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र. कुलगुरू डॉ. व्ही. एम. चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
परिषदेस माध्यमिक शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे, महोत्सव समितीचे उपाध्यक्ष प्राचार्य भैरव कुंभार, सचिव सी. एम. गायकवाड, खजिनदार प्रभाकर हेरवाडे, राजाराम वरुटे, रजनी हिरळीकर, उदय पाटील, संपत गायकवाड उपस्थित होते. (प्रतिनिधी)
‘आम्ही कोल्हापुरी’ स्टॉल
या महोत्सवाच्या निमित्ताने ग्रंथखरेदी विक्रीतून लाखोंची उलाढाल होत असते. यंदा या महोत्सवात ‘आम्ही कोल्हापुरी’ हे विशेष स्टॉल मांडण्यात येणार आहे. हा स्टॉल फक्त कोल्हापुरातील नवोदित लेखक प्रकाशकांसाठी असणार आहेत. त्यामुळे नवोदित लेखकांना व्यासपीठ मिळणार आहे.
महोत्सवातील कार्यक्रम असे
सकाळी ९ वाजता : ग्रंथदिंडी, ११ वाजता : ग्रंथमहोत्सव उद्घाटन, दुपारी ३ वाजता : वाचनातून घडलो आम्ही (मुलाखतपर कार्यक्रम), संध्याकाळी ७ वाजता : शाळांचे सांस्कृतिक कार्यक्रम
सकाळी ९ : हास्यबहार (सादरकर्ते : वसंत हंकारे), सकाळी ११ वाजता : आमची वाटचाल (मुलाखतपर कार्यक्रम), दुपारी ३ वाजता : शिवप्रभूंचे पहिले चरित्र म्हणजे सभासद बखर (स्लाईड शो), संध्याकाळी ७ वाजता : सांस्कृतिक कार्यक्रम
सकाळी ९ वाजता : बालरंजन (सादरकर्त्या : रजनी हिरळीकर), सकाळी ११ वाजता : वाचन ही काळाची गरज (व्याख्यान), दुपारी ३ वाजता : कविसंमेलन, संध्याकाळी ७ वाजता : सांस्कृतिक कार्यक्रम
सकाळी ९ वाजता : संवाद कौशल्य व व्यक्तिमत्त्व विकास (व्याख्यान), दुपारी ३ वाजता : ग्रंथमहोत्सव समारोप, संध्याकाळी ७ वाजता : स्वराक्षरनिर्मित आपली गाणी (सादरकर्ते विश्वराज जोशी)