अखेर आपटेनगर रस्त्यावर डांबर
By admin | Published: February 19, 2015 12:17 AM2015-02-19T00:17:59+5:302015-02-19T00:21:17+5:30
पाच वर्षाची प्रतिक्षा : बोंद्रेनगरपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण --लोकमतचा प्रभाव
कळंबा : कळंबा साई मंदिर ते फुलेवाडी रिंगरोड हा उपनगरातील मुख्य रस्ता नगरोत्थान योजनेंतर्गत मंजूर झाला. कामाची सुरुवात करताना दोन वर्षे रस्त्यावर सुमार दर्जाची खडी पसरण्यात आली. नंतर ठेकेदारानेही काम गुंडाळल्याने पालिका प्रशासनाच्या अनास्थेने काम अर्धवट अवस्थेत होते. नित्याच्या अपघाताने वाहनधारकांना, तर धुळीने परिसरातील रहिवाशांनी गेली पाच वर्षे आवाज उठविला होता. नागरिकांच्या समस्या मांडल्या होत्या. या रस्त्याचे डांबरीकरण बोंद्रेनगरपर्यंत पूर्ण झाले आहे. आसपासच्या गावांना व उपनगरांतील नागरिकांना शहराशी जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता. नुकत्याच केलेल्या सुमार खडीकरणाने पॅचवर्क व अपघात नित्याचे बनले होते. डांबराविना रस्त्याची दुर्दशा झाली हे पाहण्याचे औदार्य ना प्रशासनाने ना लोकप्रतिनिधींनी दाखविले. सुमार रस्त्याचे डांबरीकरण होणार कधी, हा प्रश्न नागरिकांना पाच वर्षे सतावत होता.
रस्ता पूर्ण होऊन डांबरीकरण व्हावे यासाठी, रस्त्याच्या सुमार दर्जाविषयी वारंवार ‘लोकमत’मधून बातम्या प्रसिद्ध होत होत्या. अलीकडे प्रभागाच्या समस्या सदरात परखड मत मांडले होते. या बातम्यांची दखल घेऊन नगरसेवक इंद्रजित बोंद्रे यांनी अखेर पालिका निवडणुकीपूर्वी प्रलंबित रस्ता डांबरीकरणाचा प्रश्न मार्गी लावून नुकतेच रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण केल्याने वाहनधारक व नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. ( वार्ताहर )
साई मंदिर ते
आपटेनगर मुहूर्त कधी?
आपटेनगर ते रिंगरोड अर्ध्या रस्त्याचे डांबरीकरण झाले तरी साई मंदिर, कळंबा या रस्त्यास डांबर कधी लागणार? रस्त्याच्या एका बाजूचे महेश गायकवाड, तर दुसऱ्या बाजूचे इंद्रजित सलगर प्रतिनिधित्व करत आहेत. दोन प्रभागांच्या मधून जाणाऱ्या हमरस्त्याचे डांबरीकरण करायचे कोणी, हाच कळीचा मुद्दा.
लढ्याला यश
आपटेनगर ते रिंगरोड रस्ता डांबरीकरण व्हावे यासाठी क्रांतिसिंह नाना पाटील, ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव बंडोपंत दळवी व सहकारी, सामाजिक कार्यकर्ते विजयसिंह देसाई हे परिसरातील मंडळे, नागरिक, महिला बचत गटांसह आंदोलने, रास्ता रोको, निवदने यांसह झगडत होते. त्यांच्या प्रयत्नांस यश आले.