अखेर कोल्हापुरातून विमानाचे टेकआॅफ, महिला, दिव्यांग मुलांनी घेतला हवाई प्रवासाचा आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 03:53 PM2018-04-17T15:53:43+5:302018-04-17T16:04:37+5:30
गेली कित्येक वर्षे चर्चेत असलेली कोल्हापूर-मुंबई विमानसेवा मंगळवारपासून अखेर सुरु झाली. केंद्र सरकारच्या उडान योजनेंतर्गत ‘एअर डेक्कन’चे पहिले विमान दुपारी तीन वाजता कोल्हापुरातून मुंबईकडे झेपावले. विशेष म्हणजे या पहिल्या विमानातून कष्टकरी महिला, दिव्यांग मुले, विद्यार्थ्यांनी हवाई प्रवासाचा आनंद घेतला.
कोल्हापूर : गेली कित्येक वर्षे चर्चेत असलेली कोल्हापूर-मुंबई विमानसेवा मंगळवारपासून अखेर सुरु झाली. केंद्र सरकारच्या उडान योजनेंतर्गत ‘एअर डेक्कन’चे पहिले विमान दुपारी तीन वाजता कोल्हापुरातून मुंबईकडे झेपावले.विशेष म्हणजे या पहिल्या विमानातून कष्टकरी महिला, दिव्यांग मुले, विद्यार्थ्यांनी हवाई प्रवासाचा आनंद घेतला.
सहा वर्षांनंतर कोल्हापूरची ही विमानसेवा सुरू झाली.मुंबईतून दुपारी १ वाजून २५ मिनिटांनी निघालेल्या एअर डेक्कनच्या विमानातून चेंबर आॅफ कॉमर्स, क्रिडाई कोल्हापूर, हॉटेल मालक संघ, गोशिमा, स्मॅक आदी विविध संघटनांचे प्रतिनिधी, उद्योजक आणि खासदार धनंजय महाडिक यांनी टेक आॅफ केले. ते दुपारी कोल्हापूरात पोहोचले.
यानंतर लगेचच कोल्हापुरातून दुपारी तीन वाजून पाच मिनिटांनी याच फ्लाईटने मुंबईकडे झेप घेतली. या विमानातून हेल्पर्स आॅफ दि हॅन्डिकॅप्ड, अंधशाळा, बालकल्याण संकुलातील दोन मुले, एकटी संस्था आणि बचत गटातील दोन महिलांचा तसेच एका शेतकरी दाम्पत्याचा समावेश होता. दरम्यान, विमानसेवेच्या प्रारंभानिमित्त हॉटेल मालक संघातर्फे विमानतळ येथे येणाऱ्या प्रवाशांसाठी अल्पोपहार देण्यात आला.
सर्वसामान्यांना आनंद
जिल्ह्यातील पर्यटन, व्यापार, उद्योगवाढीसाठी विमानसेवा सुरू होणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सहा वर्षांनंतर सुरू झालेल्या या विमानसेवेचा प्रारंभ अभिनव पद्धतीने केला गेला. ज्यांनी यापूर्वी कधीच विमान प्रवास अनुभवलेला नाही, विमानही जवळून पाहिलेले नाही, अशा गोरगरीब, सर्वसामान्यांना कोल्हापूर-मुंबई विमानप्रवास घडविण्यात खासदार धनंजय महाडिक यांनी पुढाकार घेतला. ते म्हणाले, कोल्हापुरातून उड्डाण करणाऱ्या पहिल्या विमानातून सर्वसामान्य महिला, मुलांना प्रवासाचा आनंद मिळणे गरजेचे आहे.