सदाबहार फुटबॉलपटू राजेंद्र दळवी (ज्युनिअर)
By admin | Published: January 6, 2017 12:36 AM2017-01-06T00:36:43+5:302017-01-06T00:37:07+5:30
खिलाडूवृत्ती व नेत्रदीपक कौशल्याच्या जोरावर फुटबॉल रसिकांच्या मनावर राज्य केले. फुटबॉलशिवाय हॉकीमध्येही त्याने आपले कौशल्य
फुटबॉलचा कोणताही वारसा नसताना केवळ आपल्या कौशल्याच्या जोरावर ्नराजेंद्र दळवी (ज्युनिअर) याने कोल्हापूरच्या फुटबॉलमध्ये नावलौकिक मिळविला. मिड फिल्डला खेळणाऱ्या या खेळाडूने आपल्या खिलाडूवृत्ती व नेत्रदीपक कौशल्याच्या जोरावर फुटबॉल रसिकांच्या मनावर राज्य केले. फुटबॉलशिवाय हॉकीमध्येही त्याने आपले कौशल्य दाखवून दिले होते.
राजेंद्र वसंतराव दळवी (ज्युनिअर) याचा जन्म शिवाजी पेठेत झाला. राजूला फुटबॉलचा वारसा नव्हता; पण मोठ्यांचे होणारे फुटबॉल सामने आणि शाळा सुटल्यानंतर होणारे मुलांचे टेनिस चेंडूचे खेळ, शिवाय तालमीपुढे नेहमी चालणारे मर्दानी खेळ हे पाहूनच राजूला खेळाची प्रेरणा मिळाली.
वेळ मिळेल तेव्हा रंकाळ्यात राजघाटावर पोहणे, दिवसभर खेळणे, ४ फूट ११ इंच मापाच्या स्पर्धेत भाग घेणे, यामुळे राजूचा सराव मोठ्या प्रमाणावर होत असे. तो १९७७ साली स. म. लोहिया हायस्कूलमध्ये दाखल झाला. शालेयस्तरावर त्याने आपली चमक दाखविण्यास प्रारंभ केला. मिड फिल्ड (सेंटर हाफ) या महत्त्वाच्या जागी एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्याने स्वत:ला सिद्ध केले. याच काळात शालेय, शासकीय स्पर्धेत राज्यस्तरावर त्याची निवड झाली. या संघातून त्याने बीड, यवतमाळ, जालना येथे आपल्या खेळाचे नेत्रदीपक प्रदर्शन केले. त्याचबरोबर त्याला महाराष्ट्राच्या संघातून आगरतळा, गुवाहाटी येथे राष्ट्रीय स्तरावर संधी मिळाली. उत्कृष्ट खेळाबद्दल त्याला सलग दोन वर्षे महाराष्ट्र राज्य शालेय क्रीडा शिष्यवृत्ती मिळाली.
राजू उंचीने जेमतेम होता; पण शरीर काटक व चपळ होते. सेंटर हाफला खेळत असताना गरुडाच्या नजरेने बॅक आणि फॉरवर्डकडे त्याचे सदोदित लक्ष असे. थाय, चेस्ट, अँकल ट्रॅपिंंगमध्ये तो वाक्बगार होता. अशा एव्हरग्रीन राजूकडे सीनिअर संघांचे लक्ष वेधले गेले.
राजूने नव्याने स्थापन झालेल्या मर्दानी खेळाचा आखाडा या संघातून वरिष्ठ गटातील स्पर्धा खेळण्यास सुरुवात केली. या संघातून बराच काळ खेळल्यानंतर दे दणादण फुटबॉल संघ, महांकाली तालीम भजनी मंडळ, संध्यामठ तरुण मंडळ, आदी संघांत त्याने आपल्या सेंटर हाफ या जागेचा दर्जा दाखवून दिला. त्याचा खेळ पाहून त्याला महापालिका फुटबॉल संघात संधी मिळाली. त्याच्या उत्कृष्ट खेळामुळे महापालिकेत त्याला कायमची नोकरी मिळाली. या संघातून खेळताना कोल्हापूरबाहेर अनेक ठिकाणी त्याला आपले फुटबॉलमधील कौशल्य दाखविता आले. बीड, यवतमाळ, जालना, पुणे, मुंबई, गोवा, चेन्नई, बेळगाव, सांगली, मिरज, आदी ठिकाणी त्याला खेळण्याची संधी मिळाली व बाहेरगावच्या सर्वोत्तम खेळाडूंचा खेळ पाहावयास मिळाला.
संध्यामठ संघातून खेळत असताना राजूला एका सामन्यातील कामगिरी आजही आठवते. एका स्पर्धेतील प्रॅक्टिस विरुद्ध संध्यामठ हा सामना सुरू होता. सामन्याच्या सुरुवातीलाच प्रॅक्टिसने संध्यामठवर दोन गोल्स् केले. उत्तरार्धात संध्यामठने दोन गोल्स् फेडल्याच, शिवाय दोन गोल्स् करून सामना ४-२ गोल्स्ने जिंंकला. राजूचा या सामन्यात सिंंहाचा वाटा होता. संध्यामठचे हे पहिले विजेतपद होते.
फुटबॉलशिवाय राजू हॉकीमध्येही उत्तम खेळाडू होता. शालेय स्तर व ओपन टुर्नामेंटस्मध्ये राजूने आपल्या गतिमान खेळाने हॉकीच्या अनेक स्पर्धा गाजविल्या आहेत. फुटबॉल आणि हॉकीसह राजूने फुटबॉल रेफ्रीचे काम अनेक वर्षे उत्तमरीत्या निर्दोष पार पाडले आहे.
राजूला फुटबॉल खेळामुळे प्रसिद्धी मिळाली. कायमची नोकरी मिळाली. भारतात अनेक ठिकाणी खेळण्याची संधी मिळाली. राजू क्रीडांगणावरील एक सज्जन खेळाडू म्हणून प्रसिद्ध होता. क्रीडांगणावरील शिस्त अथवा रेफ्रीच्या नियमास त्याने बाधा आणली नाही.
(उद्याच्या अंकात : आण्णासाहेब नालंग)
प्रा. डॉ. अभिजित वणिरे