दरवर्षी २० हजार विविध बियांचे रोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 12:17 AM2018-07-25T00:17:36+5:302018-07-25T00:17:39+5:30
कोल्हापूर : ‘आपण समाजाचं देणं लागतो’ या उक्तीप्रमाणे काही माणसं निरपेक्ष भावनेने सामाजिक कार्यात स्वत:ला वाहून घेतात. असेच एक ध्येयवेडे आहेत पर्यावरणीप्रेमी पिशवी (ता. शाहूवाडी) येथील मानसिंग पाटील. ते प्रत्येकवर्षी २० हजार बिया गोळा करून त्याचे रोपण करतात. गत तीन वर्षांपासून ते हा उपक्रम
राबवित असून, इतरांसाठी तो उपफक्रम प्रेरणादायी आहे.
मानसिंग मधुकर पाटील यांनी एम. ए., बी.पी.एड., एम.फिल. केले आहे. मात्र, नोकरीच्या मागे न लागता युवकांना शारीरिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी त्यांनी बांबवडे येथे व्यायामशाळा सुरू केली. त्यांना ट्रेकिंगचीही आवड आहे. यातूनच पर्यावरण रक्षणासाठी वर्षभरात २० हजार बिया जमा करण्याचा संकल्प केला. यातूनच ट्रेकिंगला गेल्यावर मिळेल त्या बिया गोळा करतात. नवरात्र उत्सवात भक्तांनी विविध फळे खाऊन फेकून दिलेल्या बिया गोळा करतात. या सर्व बिया खराब होऊ नयेत यासाठी स्वच्छ धुऊन, औषध फवारणी करून पॅकबंद पिशव्यांमध्ये साठवितात. पावसाळा सुरू झाला की, ते या बियांचे माळरानासह रोपण करतात. त्यांना अजय पाटील सहकार्य करतात.
वाढदिवसाचा खर्च सामाजिक संस्थेस
मानसिंग पाटील यांनी मुलगा मानस याच्या वाढदिवसाला येणाऱ्या खर्चाची सर्व रक्कम भैरवनाथ पर्यावरण व सामाजिक संस्थेस देतात. केक, फुगे, रोषणाई, जेवणावळी यावर होणाºया वायफळ खर्चाला फाटा देत ते सामाजिक कार्यातून मुलाच्या वाढदिवसाचा क्षण अविस्मरणीय बनवितात.