रस्ते अपघातात रोज दोघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:17 AM2017-07-20T00:17:41+5:302017-07-20T00:17:41+5:30
कोल्हापूर विभागात प्रतिदिन ७ अपघात, तर ८ जखमी असे प्रमाण
कोल्हापूर, सांगली, सातारा, कऱ्हाड अशा प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत येणाऱ्या विभागांत उपप्रादेशिक विभागात दररोज सात रस्ते अपघात होतात. त्यात किमान आठजण जखमी होतात, तर प्रतिदिन दोन व्यक्तींना जीव गमवावा लागतो.
प्रादेशिक परिवहन अंतर्गत येणाऱ्या कोल्हापूर, सांगली, सातारा अशा कार्यक्षेत्रात २०११ च्या जनगणनेनुसार ९६ लाख ९८ हजार इतकी लोकसंख्या आहे. या लोकसंख्येमध्ये सात व्यक्तींच्या कुटुंबामध्ये दोन वाहने, असे प्रमाण आहे. त्याप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये तीन व्यक्तींच्या मागे एक वाहन असे प्रमाण झाले आहे.
कोल्हापूर, सांगली, सातारा या क्षेत्रात २०१५ मध्ये २८०५ इतके अपघात झाले. हे प्रमाण लक्षात घेता विभागात प्रतिदिन सरासरी ७.६८ इतके अपघात झालेले आहेत. या अपघातांमध्ये ७७० व्यक्ती मृत्युमुखी पडल्या म्हणजेच प्रतिदिन २ व्यक्तींना आपला जीव रस्ता सुरक्षेचे नियम न पाळल्यामुळे गमवावा लागला. या अपघातात याच कालावधीत २९९२ व्यक्ती जखमी झालेल्या असून, प्रतिदिन आठ व्यक्ती जखमी होण्याचे प्रमाण आहे.
रस्त्यावरील अपघातात मनुष्यहानीबरोबर मालमत्ता हानीमुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान प्रत्येक वर्षी होत आहे. त्यात मोटारवाहन निर्मिती नुकसान, वैद्यकीय खर्च, न्यायालयाचा खर्च, विमा खर्च, आदी खर्च हे राष्ट्रीय उत्पन्नाच्या प्रमाणात मोठे आहेत. या अपघातात बहुतांशी कुटुंबातील कर्ते पुरुष व्यक्तीच मृत्युमुखी पडत आहेत. त्यामुळे त्यांचे कुटुंंबही उद्ध्वस्त होत आहे. मात्र, अपघातच होऊ नये यासाठी रस्ते नियमांची माहिती घेणे आवश्यक आहे. ही बाब मात्र, वाहन चालविणारा चालक मनावरच घेत नाही. त्यामुळे हे प्रमाण वाढत आहे.
रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी चालक, मालक, पादचारी यांनी विविध सिग्नल्स, वाहतुकीची चिन्हे, नियम, वेगावर नियंत्रण, समोरील वाहनास ओव्हरटेक करताना घ्यावयाची काळजी याबाबत जागरूक असणे गरजेचे आहे. रहदारी नियम पाळण्याबाबत पाल्यांना योग्य शिक्षण देणे गरजेचे आहे.
- डॉ. डी. टी. पवार,
प्रादेशिक परिवहन अधिकारी.
जीव वाचावा यासाठीच हेल्मेटचा आग्रह
दुचाकींच्या अपघातामध्ये रस्त्यावर पडून मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. डोक्याला मार लागल्यानेच हे मृत्यू होत आहेत. त्यामुळेच दुचाकीधारकांनी नामांकित कंपनीच्या हेल्मेटचा वापर करावा, असा आग्रह आहे. आपल्याच जिवाची काळजी घेण्यासाठीच हा आग्रह आहे.
- विश्वास नांगरे-पाटील,
विशेष पोलीस महानिरीक्षक
मदतीला धावून जा
चारचाकीचा अपघात घडल्यानंतर प्रथम चालकावर हल्ला केला जातो. ही बाब चुकीची असून, याबाबत समाजामध्ये जागृती होणे आवश्यक आहे. अशा वेळी अन्य चालकांनीही मदतीला धावून जावे. चालकही प्रवाशांचा सहकारी असतो. त्यांच्याकडेही मानाने पाहावे.
- भूपाल शेटे, नगरसेवक
हेल्मेटचा वापर करा
रस्त्यावरील अपघातात दुचाकीस्वाराच्या मानेच्या आणि मुख्य म्हणजे डोक्याला मोठी गंभीर दुखापत होते. त्यामुळे त्याच्या मेंदूला इजा होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे हेल्मेटचा वापर करणे गरजेचे आहे, हे आता शास्त्रोक्त पद्धतीने सिद्ध झाले आहे.
- डॉ. संतोष प्रभू, न्युरो सर्जन.
वाढते दुचाकीचे अपघात टाळण्यासाठी व पाल्यांच्या जीविताचे रक्षण महत्त्वाचे मानून पालकांनी आपल्या पाल्याच्या ताब्यात दुचाकी देतानाच त्याने हेल्मेट घातले आहे की नाही याची खातरजमा करावी.
दिवसेंदिवस दुचाकी अपघातात मृत्यू पावणाऱ्यांची संख्या वाढत आहे. विशेषत: यामध्ये १६ ते २२ वयोगटांतील युवावर्गाचा अधिक भरणा आहे. ही पिढी उद्याचे देशाचे भविष्य आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याला दुचाकी ताब्यात देतानाच त्याच्याबरोबर हेल्मेट घालण्याची सक्तीही करावी. दुर्दैवाने दुचाकी चालविताना काही अपघात झाल्यास प्रथम त्याच्या डोक्याला मार लागतो. त्यामुळे अनेकदा गंभीर जखमी किंवा मृत्यू ओढावतो.
विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात दुचाकी खरेदीचा वेग मोठा आहे. त्यामुळे सरासरी प्रत्येक घरात दोन दुचाकी आहेत. त्यात बहुतांशीवेळा पालकांची नजर चुकवून पाल्य दुचाकी फिरवितात. अशावेळी दुदैवाने अपघात झाल्यास त्यांच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना नसतो. ही बाब गंभीर आहे.
याशिवाय पाल्य दहावी पास झाल्यानंतर त्याला महाविद्यालयाला जाण्यासाठी दुचाकी घेऊन दिली जाते. त्यावेळी पालकांनी दुचाकी खरेदी करताना वाहन विक्रेत्यांकडून दोन हेल्मेट घेणे जरुरीचे आहे.
दुचाकी विक्री करताना ग्राहकाला दोन हेल्मेट देणे विक्रेत्याला बंधनकारक आहे. पालकांनीही आवर्जून हेल्मेट न चुकता मागून घ्यावीत. ते खरेदी करताना ती आयएसआय मानांकनाचीच घ्यावीत. रस्त्यावरील विक्रेत्यांकडे मिळणारी हेल्मेट कमी दर्जाची व अपघातात ती डोक्याचे संरक्षण करू शकत नाहीत. त्यामुळे नागरिकांनी आयएसआय मार्कची हेल्मेट खरेदी करावीत.