Maharashtra Assembly Election 2019 दिलं सगळं, पण झालं वेगळं... फुललच नाही कमळ...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 12:24 PM2019-10-26T12:24:08+5:302019-10-26T12:42:09+5:30
जुन्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखला जाईल, असे जाहीर भाषणात सांगितले जात असताना तीच-तीच माणसे वेगवेगळ्या समित्यांवर, पदांवर दिसू लागली. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्यासोबत हीच १० माणसे असे चित्र तयार झाले.
समीर देशपांडे
कोल्हापूर : राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा कोल्हापूर जिल्हा ‘भाजपमुक्त’ झाल्याने भाजपला आता खरोखरच ‘आत्मचिंतन’ करावे लागणार आहे. कोट्यवधी रुपयांची कामे झाली. भाजपची ताकद वाढविण्यासाठी नेत्यांची आयात झाली. तरीही भाजपला दोन जागा राखता आल्या नाहीत. पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेरील एकमेकांना ताकद दाखविण्याच्या आणि शिवसेनेला चेपण्याच्या नादात हा सगळा प्रकार घडल्याचे भाजपचेच कार्यकर्ते मान्य करीत आहेत. इचलकरंजी आणि कोल्हापूर दक्षिणमध्ये भाजपची सामूहिक ताकद लागली नसल्याची चर्चा आहे.
पाच वर्षांपूर्वी राज्यात युतीची सत्ता आली आणि चंद्रकांत पाटील हे चढत्या क्रमांकाने राज्यातील महत्त्वाचे नेते बनले. महसूल, सार्वजनिक बांधकाम, कृषी यासारखी वजनदार खाती, कोल्हापूर, जळगाव आणि नंतर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद, मराठा आरक्षणाबाबत नेमलेल्या उपसमितीचे अध्यक्ष... अशा एक ना अनेक जबाबदा-या पाटील यांच्यावर सोपविण्यात आल्या आणि त्या त्यांनी नेटाने पार पाडल्याही.
कोल्हापूर जिल्ह्यात भाजपची ताकद वाढविण्यासाठी तालुकास्तरीय नेत्यांना पक्षात घेताना जुन्या कार्यकर्त्यांची मने तुटणार नाहीत, याची काळजी घेतली गेली नाही. सत्तेची विविध पदे देताना भौगोलिक व अन्य समतोल राखला गेला नाही. ज्या १२ जणांच्या महामंडळांवर नियुक्त्या जाहीर केल्या, त्यांना अधिकृत पत्रेही देण्यात भाजपला यश आले नाही. जुन्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखला जाईल, असे जाहीर भाषणात सांगितले जात असताना तीच-तीच माणसे वेगवेगळ्या समित्यांवर, पदांवर दिसू लागली. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्यासोबत हीच १० माणसे असे चित्र तयार झाले.
कोल्हापूर जिल्ह्यात एकीकडे अनेक सामाजिक उपक्रमांना मोठे पाठबळ देताना तालुका आणि गावपातळीवर कार्यकर्त्यांच्याही काही अपेक्षा असतात, याकडे पाटील यांच्याकडून राज्याच्या व्यापामुळे दुर्लक्ष झाले. त्यांची वेळ घेणे भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्याही जिवावर येऊ लागले. ‘दादा भेटत नाहीत, त्यांना वेळ घेतल्याशिवाय भेटायला गेले किंवा घरी गेले तर आवडत नाही’ अशा तक्रारी वाढू लागल्या. पाटील यांच्या प्रचंड कामाच्या व्यापामुळे ते योग्य वाटत असले तरी त्यांचेच कार्यकर्ते जिल्ह्यातील अन्य नेत्यांशी याची तुलना करू लागले. परिणामी जुनी माणसे मनापासून राबण्याचे प्रमाण कमी झाले.
विधानसभा निवडणूक जाहीर झाली आणि सामंजस्याने असो किंवा नसो; परंतु अशोक चराटी, शिवाजी पाटील, रमेश रेडेकर, अशोक माने, अनिल यादव, पी. जी. शिंदे, समरजितसिंह घाटगे यांच्यासारखे नेते आणि अनेक कार्यकर्ते भाजपपासून लांब गेले. त्यामुळे ‘धनुष्यबाण’ मोडून काढण्यासाठीच ‘जनसुराज्य’च्या मदतीने खेळी केल्याच्या चर्चेला बळ मिळाले. त्यातच पाटील यांनी पुण्यातील कोथरूडमधून उमेदवारी घेतली आणि त्यांना कोल्हापूरसाठी वेळ देता आला नाही, हे वास्तव आहे. या सगळ्यांबाबत कोणताही अभिनिवेश न बाळगता खुल्या मनाने चर्चा होऊन आत्मचिंतन केल्यास भाजप पुन्हा जिल्ह्यात उभारी घेऊ शकतो, यात शंका नाही.
- ‘महाडिक’ फॅक्टर महत्त्वाचा
एकीकडे भाजपला जिल्हाभर मजबूत करण्यासाठी धनंजय महाडिक यांच्यासारखा मोहरा पाटील यांनी पक्षामध्ये घेतला; परंतु ‘त्यांना आधी काही वर्षे काम करू द्या. लगेचच राज्यस्तरीय पद कशाला?’ असे म्हणणारा एक गट भाजपमध्येच निर्माण झाला. महाडिक यांचा गट मोठा असल्याने भाजपच्या काही पदाधिकाºयांना असुरक्षित वाटू लागल्याने त्यांनीही विधानसभा निवडणुकीत महाजनादेश यात्रेप्रमाणेच अंग राखूनच काम केल्याची उघड चर्चा आहे. ‘दक्षिण’मध्ये भाजपपेक्षा महाडिक गट म्हणून त्यांचे काम सुरू होते. ते आम्हांला रुचले नाही, असेही काही भाजप पदाधिकाºयांचे म्हणणे आहे. महाडिक गट आणि भाजप हे एकमेकांत एकरूप कसे होतात आणि त्यात चंद्रकांत पाटील यांची भूमिका कशी राहते, यावरही अनेक गोष्टी अवलंबून आहेत.
- अधिका-यांचे राज्य
प्रचंड कामाचा व्याप असल्याने जबाबदाºया विभागून देऊन कार्यकर्त्यांना मोठेपणा देण्यापेक्षा चंद्रकांत पाटील हे अधिकाºयांवर फार अवलंबून राहतात, असाही सार्वत्रिक सूर पक्षातून उमटत आहे. सत्तेचा कोणी गैरफायदा घेऊ नये यासाठी ते दक्षता घेत असले तरी त्यामुळे कार्यकर्ते आणि भाजप पदाधिकाºयांपेक्षा अधिका-यांच्या शब्दाला फार वजन असल्याची भावना कार्यकर्त्यांमधून बळावली आहे.