जगदंबा तलवारीचा मिळाला पुरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:43 AM2021-03-13T04:43:11+5:302021-03-13T04:43:11+5:30

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली जगदंबा ही तलवार इंग्लंड येथील राणीच्या वैयक्तिक संग्रहालयात रॉयल कलेक्शन ट्रस्ट येथे ...

Evidence of Jagdamba sword found | जगदंबा तलवारीचा मिळाला पुरावा

जगदंबा तलवारीचा मिळाला पुरावा

Next

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली जगदंबा ही तलवार इंग्लंड येथील राणीच्या वैयक्तिक संग्रहालयात रॉयल कलेक्शन ट्रस्ट येथे ठेवण्यात आली आहे. याचे ठोस पुरावे तेथील सी. प्युरडॉन क्लार्क यांनी तयार केलेल्या कॅटलॉगमुळे मिळाले असल्याची माहिती सह्याद्री इतिहास संशोधन केंद्राचे सचिव अमित आडसुळे आणि शिवदुर्ग संवर्धन आंदोलनाचे अध्यक्ष हर्षल सुर्वे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

आडसुळे म्हणाले, कोल्हापूरचे चौथे शिवाजी महाराज यांनी सन १८७५ मध्ये भारतभेटीवर आलेल्या तत्कालीन ग्रेट ब्रिटनचा युवराज प्रिन्स ऑफ वेल्स याला एक तलवार आणि एक कट्यार भेट दिली होती. ही तलवार शिवाजी महाराजांच्या वापरातील जगदंबा तलवार होती हे संशोधक इंदरजित सावंत यांनी आपल्या पुस्तकातून आधीच सिद्ध केले आहे. मात्र इंग्लंडला गेल्यानंतर या तलवारीबाबत चुकीची माहिती दिली जाते. मात्र इंग्लंडमधील साडून केनस्टिंग गॉन म्युझियमचे संचालक सी. प्युरडॉन क्लार्क यांनी तयार केलेल्या कलेक्शन ऑफ इंडियन आर्म्स ॲण्ड ऑबजेक्टस् ऑफ आर्ट या कॅटलॉमुळे एक नवा पुरावाच पुढे आला आहे. यामध्ये या तलवारीचे छायाचित्र आणि माहिती देण्यात आली आहे.

हर्षल सुर्वे म्हणाले, या कॅटलॉगमुळे शिवरायांची तलवार आमच्याकडे नाही असे वारंवार लिहून देणाऱ्या रॉयल कलेक्शन ट्रस्टच्या अधिकाऱ्यांचा खोटेपणा उघड झाला आहे. त्यामुळे आता ही तलवार परत आणावी यासाठी राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री यांना मेल केले आहेत. पत्रे पाठवली आहेत. उद्या सकाळी याच मागणीसाठी तावडे हॉटेलजवळ रास्ता रोको करण्यात येणार आहे. खासदार संभाजीराजे यांनाही याबाबत निवेदन दिले आहे. या पत्रकार परिषदेला प्रदीप हांडे, चैतन्य आष्टेकर, रविराज कदम, अमृता सावेकर, आदित्य पवार, युवराज हळदीकर, देवराज सावंत उपस्थित होते.

चौकट

कॅटलॉगमधील तलवारीचे वर्णन

जुनी युरोपिअन एकपाती, सरळ तलवार, ज्याच्या दोन्ही बाजूला दोन खोबणी असून, एकामध्ये आयएचएस असे तीन वेळा कोरले आहे. तलवारीच्या मुठीजवळील गजावरती सोन्यामध्ये फुलांची नक्षी कोरली आहे. तलवारीची मूठ लोखंडी असून, त्याला गोलाकार परज असून, शेवटचे टोक अणकुचीदार आहे आणि त्यावर भरीव सोन्याने कोरलेली फुलांची नक्षी असून, त्यामध्ये मोठे हिरे व माणिक जडवलेले आहेत. ही तलवार कोल्हापूरच्या मा. छत्रपतींच्याकडून दिली गेली असून, ती मराठ्यांचे प्रमुख शिवाजी यांची निशाणी आहे. सदर तलवार ही त्यांच्या वापरातील होती.

चौकट

इंग्लंड कसोटीवेळी गनिमी कावा

इंग्लंडविरोधात पुण्यात जी कसोटी होणार आहे तेव्हा गनिमी काव्याने सामन्याला विरोध केला जाणार आहे. ही तलवार परत द्या, अशी आमची मागणी आहे. त्यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी, नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

११०३२०२१ कोल जगदंबा

याच छायाचित्रात मध्यभागी असलेली जगदंबा तलवार.

Web Title: Evidence of Jagdamba sword found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.