माजी सैनिक हक्काच्या पेन्शनपासून वंचित का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 10:57 AM2019-11-19T10:57:13+5:302019-11-19T10:57:51+5:30
अध्यक्षीय भाषणात ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी कोल्हापूर टेरिअर संघटनेच्या कार्याला बळ देण्यासाठी सिंधुदुर्ग येथे एक एकर जमीन देण्याची घोषणा केली. तसेच ओरस येथे संघटनेला कार्यालय, आजी-माजी सैनिकांच्या मुलांसाठी दरवर्षी १० मुलांना शिष्यवृत्ती देणार असल्याचेही सांगितले.
कोल्हापूर : सैनिक आपल्या घराची-मुलाबाळांची चिंता न करता जिवाची बाजी लावून देशसेवेसाठी आयुष्य वेचतात, अशा सैनिकांना निवृत्तीनंतर हक्काच्या पेन्शनपासून वंचित का राहावे लागते, अशा शब्दांत माजी सैनिकांनी रविवारी व्यथा मांडल्या.
येथील महासैनिक दरबार हॉलमध्ये कोल्हापूर टेरिअर परिवाराचा दुसरा मिशन जिव्हाळा हा स्नेहमेळावा झाला. मेळाव्याचे उद्घाटन निवृत्त कर्नल व्ही. व्ही. दिनेशन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून केले. तसेच शहीद सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी निवृत्त कर्नल विजयसिंह गायकवाड, निवृत्त मेजर अॅड. चंद्रकांत पाटील, पी. ए. पंडितराव, ए. एम. देवघरे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी कोल्हापूर टेरिअर संघटनेच्या कार्याला बळ देण्यासाठी सिंधुदुर्ग येथे एक एकर जमीन देण्याची घोषणा केली. तसेच ओरस येथे संघटनेला कार्यालय, आजी-माजी सैनिकांच्या मुलांसाठी दरवर्षी १० मुलांना शिष्यवृत्ती देणार असल्याचेही सांगितले. दरम्यान, वीरमाता मनीषा सूर्यवंशी, वीरपत्नी तसेच आजी-माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला क-हाडच्या शिवम प्रतिष्ठानच्या बालभाव सरिता वाद्यवृंदने देशभक्तीपर गीते सादर केली. यावेळी सृजनधारा वाद्यवृंदचे उद्घाटन प्रा. सुरेश शुक्ल यांच्या हस्ते झाले. टेरिअर परिवारचे अध्यक्ष आॅनररी सुभेदार मेजर संजय शिंदे, उपाध्यक्ष संजय पाटील, तानाजी चौगले, शिवाजी पाटील, यशवंत सूर्यवंशी यांनी संयोजन केले.