माजी सैनिकाच्या विधवा पत्नीची परवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 12:08 AM2017-09-05T00:08:04+5:302017-09-05T00:12:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
रूकडी, माणगाव : वीस वर्षे लष्करी सेवा करून सेवानिवृत्त झालेल्या सुदाम जाधव यांच्या पत्नीचे निवाºयासाठी सुरू असलेल्या संघर्षाला पूर्णविराम मिळणार का? असा संतप्त सवाल नागरिकांतून व्यक्त होत आहे. सध्या असलेल्या भूखंडाची सनद मिळविण्याकरिता या वीरपत्नीला तहसील कार्यालयामध्ये आणखीन किती चकरा माराव्या लागणार हाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. लालफितीच्या कारभाराचा फटका देशासाठी सेवा दिलेल्या माजी सैनिकाच्या पत्नीला बसत आहे.
माणगाव (ता. हातकणंगले) येथील शालन कांबळे यांचा विवाह हरोली येथील लष्करी सैनिक सुदाम जाधव यांच्याशी चाळीस वर्षांपूर्वी झाला होता. सुदाम जाधव लष्करमध्ये वीस वर्षे सेवा करून सेवानिवृत्त झाल्यानंतर बेपत्ता आहेत. त्यांची शोधाशोध करून त्यांच्या पत्ता न लागल्याने त्यांची पत्नी विधवा म्हणून वावरत आहे. कांबळे यांना दोन अपत्य होती, पण तीही आजराने मृत झाल्याने शालन कांबळे या एकाकी जीवन जगत आहेत.
फौजी कांबळे यांची हरोली येथे थोडी घरजागा व थोडी शेतीही आहे पण ती विवादित असल्याने या जागेचा उपभोग शालन कांबळे यांना घेता आला नाही. राहण्यास कोठे तरी आसरा मिळावा याकरिता त्या माणगाव येथे माहेरी आल्या.
येथे माहेरकडील नातेवाइकांनी प्रयत्न करून बेघरमधून घर मिळविण्याकरिता प्रयत्नही केला, पण ग्रामपंचायतीने शालन कांबळे यांना जागा देताना बेघरमधील पूर्वी दुसºया कुळानी वापरलेली जागा दिली. कालांतराने ही जागा मूळमालकाने दुसºया कुळाला विकल्याचा वाद उत्पन्न झाल्याने या वीरपत्नीस दुसरीकडे आसरा शोधावा लागला, पण आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने त्यांना बेघरमधूनच परत भूखंड घ्यावा लागला.
सध्या त्या पत्रावजा घरामध्येच राहत असून सध्या हे घर कधी कोसळेल याची शाश्वती नाही. जो भूखंड दिला आहे, तो तर अडगळीतील तर आहेच, पण तेथे राहणे म्हणजे जिवावर उदार होऊनच राहावे लागत आहे.
या भूखंडावर घर बांधावे तर आर्थिक ताकद नाही. तसेच राहावे तर घर कधी कोसळेल याची शाश्वती नाही अशी सद्य:परिस्थिती या वीरपत्नीची आहे. त्यांना घरकुल योजनेतून पक्के घर बांधून देण्याकरिता ग्रामपंचायत सदस्य झाकीर भालदार व बताशा कामत हे प्रयत्नशील आहेत, पण सध्या देण्यात आलेला भूखंड हा रितसर हस्तांतरित शालन कांबळे यांच्याकडे न झाल्याने या जाग्यावर शासकीय लाभातून घरकुल बांधण्यास अडचणी येत आहेत.
माणगाव (ता. हातकणंगले) येथील माजी सैनिकाची पत्नी असलेल्या शालन कांबळे यांना घरकुल योजनेतून पक्के घर बांधून देण्याची मागणी होत आहे.