पेन्शनसाठी माजी सैनिकाचा लढा
By admin | Published: June 16, 2015 01:00 AM2015-06-16T01:00:01+5:302015-06-16T01:16:01+5:30
तीन वर्षे हेलपाटे : दुहेरी निवृत्तीवेतन योजनेपासून वंचित
'राम मगदूम-गडहिंग्लज -सैन्य दलातील १५ वर्षांच्या सेवेनंतर
२३ वर्षे पोलीस दलात इमाने-इतबारे सेवा बजावली. मात्र, संरक्षण मंत्रालयाची मंजुरी असतानाही तब्बल तीन वर्षे हेलपाटे मारूनदेखील सैनिकी व नागरी या दोन्ही सेवेतील दुहेरी कुटुंब निवृत्तिवेतन योजनेंतर्गत पोलीस खात्याच्या पेन्शन कागदपत्रांवर वारस म्हणून त्यांच्या पत्नीच्या नावाचे नामनिर्देशन अद्याप झालेले नाही. हक्काच्या पेन्शनसाठी संघर्ष करणाऱ्या या माजी सैनिकाचे नाव आहे कुंडलिक महादेव करवळ !
पुष्पनगर (ता. भुदरगड) हे त्यांचे मूळ गाव. दुसऱ्या महायुद्धात भाग घेतलेल्या वडिलांच्या प्रेरणेमुळे व घरच्या हलाखीमुळे ते जुन्या मॅट्रिकनंतर सैन्यात दाखल झाले. १५ वर्षांच्या सेवेनंतर ते नायक पदावरून १ एप्रिल १९८९ ला निवृत्त झाले. त्यानंतर १९ डिसेंबर १९९० ला ते महाराष्ट्र पोलीस दलात भरती झाले. २३ वर्र्षांच्या सेवेनंतर पोलीस नाईक पदावरून ते निवृत्त झाले आहेत.
१७ जानेवारी २०१३ ला संरक्षण मंत्रालयाने माजी सैनिकांसाठी मिलिटरीबरोबरच नागरी सेवेतील नोकरीसाठी दोन कुटुंब निवृत्तिवेतन योजना मंजूर केली. मात्र, यासंदर्भात राज्य शासनाचा निर्णय नसल्यामुळे त्याचा लाभ देण्यात राज्याच्या महालेखापाल कार्यालयाने असमर्थता दर्शविली. तरीदेखील त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांपासून राज्याच्या पोलीस महासंचालकांपर्यंत वेळोवेळी अर्ज-विनंत्याद्वारे पाठपुरावा सुरूच ठेवला आहे.
कुंडलिक यांचे वडील स्व. महादेव सावळाप्पा करवळ यांनी दुसऱ्या महायुद्धात भाग घेतला होता. त्यांचे बंधू तुकाराम हेदेखील सैन्यदलातून सेवानिवृत्त झाले आहेत. संपूर्ण कुटुंबानेच देशसेवेत योगदान दिले आहे, अशी परंपरा असलेल्या सैनिकाला आपल्या हक्कासाठी सरकारी यंत्रणेशी दोन हात करावे लागत आहेत.
अखेर राज्याचा निर्णय झाला
संरक्षण मंत्रालयाच्या परिपत्रकानुसार माजी सैनिकांच्या कुटुंबास सैनिकी व नागरी अशा दोन्ही सेवेतील कुटुंब निवृत्तिवेतनातील लाभ अनुज्ञेय आहे.
त्यानुसार राज्य शासनाच्या सेवेत पुनर्नियुक्त होणाऱ्या माजी सैनिकाच्या कुुटुंबास हा लाभ देण्याचा निर्णय राज्य शासनाने २७ एप्रिल २०१५ ला घेतला आहे. मात्र, त्याच्या अंमलबजावणीची प्रतीक्षा आहे.
वीज कनेक्शनसाठीही संघर्ष
पुष्पनगरपैकी नाळवा नामक शेतवडीत करवळ यांच्या वयोवृद्ध आई आणि भाऊ सहकुटुंब राहतात.
अनेक वर्षांच्या पाठपुराव्यामुळे देशाच्या स्वातंत्र्याला ६७ वर्षे उलटल्यानंतर अलीकडेच जानेवारी २०१५ मध्ये त्यांच्या राहत्या घरात वीजकनेक्शन मिळाले.
वीजेसारखी अत्यावश्यक सेवा मिळविण्यासाठीही त्यांच्या कुटुंबाला संघर्ष करावा लागला.
सर्व माजी सैनिकांना लाभ द्यावा
सैनिकी सेवेनंतर नागरी सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या माजी सैनिकांच्या वारसांना केंद्राच्या निर्णयानुसार दुहेरी कुटुंब निवृत्तिवेतन योजनेचा लाभ मिळणे हा त्यांचा हक्क आहे. आता राज्याचाही निर्णय झाला आहे. यासाठी पात्र असणाऱ्या सर्व माजी सैनिकांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित खात्यांच्या प्रमुखांनी खास उपाययोजना करावी, हीच अपेक्षा.
- कुंडलिक करवळ, माजी सैनिक, गडहिंग्लज.