वरदच्या खुनाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:26 AM2021-08-26T04:26:26+5:302021-08-26T04:26:26+5:30

मुरगूड : सोनाळी येथील वरद रवींद्र पाटील या लहान मुलाच्या खुनाच्या तपासाचे कामकाज व्यवस्थित आणि वेगाने चालले आहे. आरोपीने ...

The exact cause of Varad's murder is still unclear | वरदच्या खुनाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट

वरदच्या खुनाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट

Next

मुरगूड : सोनाळी येथील वरद रवींद्र पाटील या लहान मुलाच्या खुनाच्या तपासाचे कामकाज व्यवस्थित आणि वेगाने चालले आहे. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपीचा गुन्हा सिद्ध होईल इतके सबळ पुरावे पोलिसांकडे आहेत; पण अद्यापही या खुनामागील कारण स्पष्ट झाले नसल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी दिली.

सोनाळी (ता. कागल) येथील सात वर्षाच्या वरद रवींद्र पाटील याच्या खूनप्रकरणी कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी आज मुरगूड पोलीस स्टेशन आणि गुन्हा घडलेले सावर्डे बुद्रुक येथील घटनास्थळाला भेट दिली.

सावर्डे येथे जाण्यापूर्वी मुरगूड पोलीस स्टेशनमध्ये सुमारे तासभर त्यांनी जिल्हा पोलीसप्रमुख शैलेश बलकवडे, अप्पर जिल्हा पोलीसप्रमुख तिरुपती काकडे, करवीर विभागाचे डीवायएसपी आर. आर. पाटील, सपोनि विकास बडवे यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन वरद खून घटनेच्या तपासाची संपूर्ण माहिती घेतली.

सावर्डे बुद्रुक येथे जाण्यासाठी ते निघाले असता, पोलीस स्टेशनच्या बाहेर माध्यम प्रतिनिधींनी त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी या खून प्रकरणातील तपास समाधानकारक असल्याचे सांगितले. या गुन्ह्यातील कागदपत्रांची तपासणी करून ती व्यवस्थित असल्याचेही सांगितले. आरोपी मारुती वैद्य याने दिलेली गुन्ह्याची कबुली, त्याने दाखवलेला मृतदेह व अन्य माहितीवरून त्याच्यावर गुन्हा सिद्ध होईल इतका पुरावा पोलिसांकडे आहे.

घटना घडण्याअगोदरच्या पार्श्वभूमीबाबत माहिती घेणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. खुनाचे कारण अद्याप शंभर टक्के स्पष्ट झाले नसून, ते स्पष्ट होईल त्यावेळी त्याबाबतची माहिती दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केेले.

मुरगूड पोलीस स्टेशनमधील बैठकीनंतर लोहिया यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसह खून घडलेल्या सावर्डे बुद्रुक येथे भेट दिली.

माध्यम प्रतिनिधींनी रोखले

वरद पाटीलच्या खुनाचा गुन्हा उघडकीस आल्यापासून पोलीस प्रशासनाने माध्यम प्रतिनिधींना कोणतीही ठोस माहिती दिली नाही. आजही विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया मुरगूडमध्ये येणार, याबाबत गुप्तता पाळण्यात आली होती. पोलीस स्टेशनमध्ये त्यांना भेटण्यासाठी दोनवेळा सर्व माध्यम प्रतिनिधींनी जाण्याचा प्रयत्न केला; पण सहा. पोलीस उपनिरीक्षक किशोर ढेरे यांनी स्टेशन आवारात येण्यास सर्वांना मज्जाव केला. शेवटी स्टेशनमधील बैठक आवरून ते गाडीत बसले, त्यावेळी सर्वांनी त्यांची भेट घेतली. सुमारे पंधरा मिनिटे त्यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला.

फोटो ओळ :- 1) सोनाळी (ता. कागल) येथील वरद पाटील यांच्या खुनाच्या तपासाची माहिती घेण्यासाठी आलेले विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया तपासाची माहिती देताना त्यांच्यासमवेत जिल्हा पोलीसप्रमुख शैलेश बलकवडे, अप्पर जिल्हा पोलीसप्रमुख तिरुपती काकडे, करवीर विभागाचे डीवायएसपी आर. आर. पाटील, सपोनि विकास बडवे.

2) वरद पाटील चा खून सावर्डे बुद्रुक येथील ज्या ठिकाणी घडला त्या ठिकाणची पाहणी करताना विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया,जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे, अप्पर जिल्हा पोलीस प्रमुख तिरुपती काकडे, करवीर विभागाचे डीवायएसपी आर आर पाटील, सपोनि विकास बडवे

Web Title: The exact cause of Varad's murder is still unclear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.