एसटीचे नेमके ठिकाण मोबाईलवर समजणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 12:08 AM2019-10-14T00:08:52+5:302019-10-14T00:08:56+5:30
प्रदीप शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : बसस्थानकांसह रस्त्यांवर एस. टी.ची वाट पाहत ताटकळत बसणाऱ्या प्रवाशांना आपली एस. ...
प्रदीप शिंदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : बसस्थानकांसह रस्त्यांवर एस. टी.ची वाट पाहत ताटकळत बसणाऱ्या प्रवाशांना आपली एस. टी. बस कुठपर्यंत आली आहे, याचे ठिकाण मोबाईलवर समजणार आहे. कोल्हापूर आगारातील गाड्यांमध्ये व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम बसविण्याचे काम सुरूआहे; त्यासाठी मोबाईल अॅप विकसित करण्याबरोबरच बसस्थानकात इलेक्ट्रॉनिक बोर्डही बसविले जाणार आहेत.
राज्य परिवहन महामंडळाकडून राबविण्यात येणाºया व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम आणि पॅसेंजर इन्फर्मेशन सिस्टीम या यंत्रणा बसविण्याचे काम कोल्हापुरातील आगारात सुरू आहे. कोल्हापूर विभागातील विविध आगारांतील मार्गांची माहिती घेण्याचे काम चालू असून, त्याचे नियोजन पूर्ण होताच प्रारंभी कोल्हापूर, संभाजीनगर व इचलकरंजी या आगारांत ही यंत्रणा सुरू होणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने अन्य आगारांत ही सिस्टीम सुरू होईल. एस. टी.ची वाट पाहणाºया प्रवाशांना आता एस.टी. बस कुठपर्यंत आली, याचा माग मोबाईल अॅपद्वारे घेणे सहज शक्य होणार आहे; पण त्यासोबत बसस्थानकांवरील डिस्प्लेवरसुद्धा ही माहिती देण्यात येणार आहे. एस.टी.चे वेळापत्रक सुधारावे आणि प्रवाशांना बसची सद्य:स्थिती समजावी यासाठी व्हीटीएस प्रणाली आणण्याचा निर्णय एस. टी. महामंडळाने घेतला आहे.
प्रवाशांच्या वेळेची बचत
व्ही.टी.एस. प्रणालीमुळे प्रवासी व एस. टी. अधिकाऱ्यांना बसची सद्य:स्थिती समजेल. प्रवाशांसाठी आगार आणि स्थानकांत स्क्रीन बसविले आहेत. त्यावर सुटणाºया व येणाºया बसगाड्या कोणत्या, बसला लागणारा वेळ, इत्यादी माहिती उपलब्ध होईल. ही सुविधा मोबाईलवरही देण्यात येणार असून, त्यावरही काम केले जात आहे. त्यामुळे बसस्थानकांसह रस्त्यांवर वाट पाहत थांबलेल्या प्रवाशांनाही याचा लाभ घेता येणार आहे.