श्रेणी सुधारण्यासाठी डिसेंबरनंतर घेणार परीक्षा - उदय सामंत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 01:36 AM2020-07-20T01:36:43+5:302020-07-20T01:36:54+5:30
देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दिल्ली, पंजाब,राजस्थान, आदी राज्यांसह आयआयटीसारख्या संस्थेने परीक्षा रद्द केली आहे.
कोल्हापूर : आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दोन वेळा दिलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रात अंतिम सत्राच्या परीक्षा सध्या घेणे शक्य नाही. त्यामुळे सरासरी पद्धतीनेप्रमाणे गुण देऊन या विद्यार्थ्यांना पदवी देण्यात येईल. पण ज्या विद्यार्थ्यांना गुण, श्रेणी सुधारण्यासाठी परीक्षा द्यावयाची आहे,त्यांच्यासाठी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर डिसेंबरनंतर परीक्षा घेतली जाईल अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दिल्ली, पंजाब,राजस्थान, आदी राज्यांसह आयआयटीसारख्या संस्थेने परीक्षा रद्द केली आहे. त्यामुळे यूजीसीने सद्य:स्थिती समजून घ्यावी. राज्यातील सर्व कुलगुरूंशी चर्चा करून, त्यांच्या शिफारशी घेऊन राज्य सरकारने अंतिम सत्राच्यापरीक्षांबाबत निर्णय घेतला आहे. अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांना आता पदवी देऊन कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर गुण, श्रेणी सुधारण्यासाठी परीक्षा घेण्याचा निर्णय यूजीसीने देशभरासाठी घ्यावा. त्याबाबचे पत्र दोन दिवसांत यूजीसीला पाठविणार आहे. त्यामुळे सध्या परीक्षेच्या मुद्द्यावरून राजकारण करण्यापेक्षा विरोधकांनी विद्यार्थिहिताचा विचार करावा, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.
मंत्री सामंत म्हणाले...
या वर्षीचे शुल्क परत मिळेल अथवा पुढील वर्षासाठी ते आकारावे, अशा पर्यायांचा विचार सरकार करीत आहे. त्यामुळे पालकांनी निर्धास्त राहावे. एटीकेटी विद्यार्थ्यांना सरासरी गुण देऊन कॅरी फॉरवर्ड केले जाईल. जे कॅरी फॉरवर्ड होणार नाहीत त्यांना ग्रेस गुण दिले जातील. तरीही जे उत्तीर्ण होणार नाहीत, त्यांची कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर परीक्षा घेतली जाईल. ग्रंथालय सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. आगामी अधिवेशनात ग्रंथालयाबाबत नवे धोरण आणले जाणार आहे.