दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांवर परीक्षेचा ताण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:42 AM2021-03-04T04:42:23+5:302021-03-04T04:42:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : ऑनलाइन शिक्षणामुळे अभ्यासक्रमाचे कमी झालेले आकलन, अजून सरासरी ३० टक्के शिल्लक असलेला अभ्यासक्रम, सराव ...
लोकमत न्यूज नेटवर्क,
कोल्हापूर : ऑनलाइन शिक्षणामुळे अभ्यासक्रमाचे कमी झालेले आकलन, अजून सरासरी ३० टक्के शिल्लक असलेला अभ्यासक्रम, सराव आणि उजळणीला मिळत असलेला कमी कालावधीमुळे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांवर यंदा परीक्षेचा ताण आला आहे. करिअरच्या दृष्टीने दहावी, बारावीतील गुण महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची चिंता वाढली आहे. आणखी २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्याची मागणी पालकांकडून होत आहे.
कोरोनामुळे जूनपासून दहावी, बारावीचे ऑनलाइन वर्ग सुरू झाले. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नोव्हेंबरपासून या इयत्तांचे ऑफलाइन वर्ग भरू लागले. त्यावेळी ऑनलाइन शिक्षणातून बहुतांश संकल्पना समजल्या नसल्याचे विद्यार्थ्यांकडून शिक्षकांना सांगण्यात आले. त्यानुसार विद्यार्थी हितासाठी अनेक शाळांनी अभ्यासक्रम पहिल्यापासून शिकविण्यास सुरुवात केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने २५ टक्के अभ्यासक्रम पूर्ण केला. उर्वरित ७५ टक्के अभ्यासक्रमापैकी ४५ टक्के अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. एक दिवस आड भरणारे वर्ग, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जादा तास घेण्यातील अडचणीमुळे उर्वरित ३० टक्के अभ्यासक्रम दीड महिन्यात पूर्ण करणे शाळांना अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे आणखी २५ टक्के अभ्यासक्रम कमी करून उर्वरित अभ्यासक्रमावर परीक्षा घ्यावी, अशी मागणी पालकांतून होत आहे.
प्रतिक्रिया
ऑनलाइन, ऑफलाइन शिक्षणामुळे यंदा दहावीच्या विद्यार्थ्यांना अधिकतर अभ्यासक्रम नीट समजलेला नाही. विद्यार्थी हित लक्षात घेऊन शासनाने ५० टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा घ्यावी.
-भारती गायकवाड, पालक, फुलेवाडी
ऑनलाइन शिक्षणातील काही संकल्पना आता वर्गातील प्रत्यक्ष शिक्षणामुळे समजल्या आहेत. त्यामुळे आम्हा सर्व विद्यार्थ्यांवर अभ्यास, परीक्षेचा ताण आला आहे. यंदा प्रश्नपत्रिकेची काठिण्यपातळी थोडी कमी करावी. उताऱ्यावरील प्रश्नांची संख्या वाढवावी.
-पार्थ वडगे, इयत्ता दहावी, राजारामपुरी
विद्यार्थ्यांवर परीक्षेचा ताण वाढत असल्याचे वास्तव आहे. तो कमी करण्यासाठी अभ्यासक्रम आणखी कमी करावा. तामीळनाडूप्रमाणे शाळा पातळीवर परीक्षा घेण्याचा विचार शासनाने करावा.
-राजेश वरक, माध्यमिक शिक्षक, कोल्हापूर
चौकट
संभ्रम दूर व्हावा
ऑफलाइन परीक्षा घेण्याचे शासनाने स्पष्ट केले असले, तरी स्वरूपाबाबत अद्याप संभ्रमावस्था आहे. वर्णनात्मक की, एमसीक्यू (वस्तुनिष्ठ बहुपर्यायी) स्वरूप असणार हे लवकर स्पष्ट व्हावे.
कोल्हापूर विभागातील विद्यार्थी संख्या
दहावी : १,८४,४५९
बारावी :१,२१,१५९