दहावीची परीक्षा मंगळवारपासून, कोल्हापूर विभागात एक लाख ४१ हजार परीक्षार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 07:14 PM2020-02-28T19:14:39+5:302020-02-28T19:16:01+5:30
दहावीच्या परीक्षेचा प्रारंभ मंगळवारी (दि. ३ मार्च) सकाळी ११ वाजता मराठी विषयाच्या पेपरने होणार आहे. ही परीक्षा दि. २३ मार्चपर्यंत चालणार आहे. या वर्षी कोल्हापूर विभागातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील एकूण एक लाख ४१ हजार विद्यार्थी-विद्यार्थिनी परीक्षा देणार आहेत.
कोल्हापूर : दहावीच्या परीक्षेचा प्रारंभ मंगळवारी (दि. ३ मार्च) सकाळी ११ वाजता मराठी विषयाच्या पेपरने होणार आहे. ही परीक्षा दि. २३ मार्चपर्यंत चालणार आहे. या वर्षी कोल्हापूर विभागातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील एकूण एक लाख ४१ हजार विद्यार्थी-विद्यार्थिनी परीक्षा देणार आहेत.
या परीक्षार्थींची कलचाचणी जानेवारीमध्ये झाली आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदादेखील या परीक्षेत गणित आणि इंग्रजी विषयाची बहुसंच प्रश्नपत्रिका असणार नाही. कोल्हापूर विभागातील एकूण ३५४ केंद्रांवर परीक्षा होणार असून, त्यावर २१ भरारी पथकांची नजर राहणार आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी सात भरारी पथके असणार आहेत.
विभागातील सर्व विद्यार्थ्यांना त्यांची प्रवेशपत्रे आॅनलाईन पद्धतीने राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उपलब्ध करून दिली आहेत. उत्तरपत्रिका आणि आवश्यक स्टेशनरी साहित्य परीक्षा केंद्रांवर पोहोचविण्यात आले. परीक्षेची तयारी पूर्ण झाली आहे.
परीक्षेच्या कालावधीत परीक्षार्थी, पर्यवेक्षक आणि केंद्र संचालकांना मोबाईल वापरण्यास बंदी आहे. विद्यार्थ्यांना कॅमेरा असलेले स्मार्टवॉच (घड्याळ), पेन वापरण्यास बंदी असल्याचे शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव सुरेश आवारी यांनी शुक्रवारी सांगितले.
परीक्षार्थींसाठी ‘हेल्पलाईन’
दहावीच्या परीक्षार्थींसाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागाकडून २४ तास हेल्पलाईन सेवा सुरू केली आहे. परीक्षेत विद्यार्थी, पालकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी मंडळातील अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांची हेल्पलाईनसाठी नियुक्ती केली आहे.
यामध्ये विभागीय सचिव एस. एम. आवारी (९४२३४६२४१४), सहसचिव डी. बी. कुलाळ (७५८८६३६३०१), साहाय्यक सचिव एस. एस. सावंत (८००७५९७०७१), वरिष्ठ अधीक्षक पी. एच. धराडे (९८५००२०७९०), एस. एल. हावळ (९८९०७७२२२९), एस. एस. कारंडे (९८६००१४३५६), आदींचा समावेश आहे. हेल्पलाईन दि. २३ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे.