दहावीची परीक्षा सुरू; परीक्षा केंद्रांवर परीक्षार्थींची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 05:51 PM2020-03-03T17:51:03+5:302020-03-03T17:53:56+5:30
भविष्यातील करिअरची दिशा ठरविण्यासाठी महत्त्वाची असलेली दहावीची परीक्षा मंगळवारी सकाळी अकरा वाजता मराठी विषयाच्या पेपरने सुरू झाली. उपकेंद्रांची नीट माहिती नसलेल्या परीक्षार्थींची त्यांचे केंद्र शोधण्यासाठी धावपळ झाली.
कोल्हापूर : भविष्यातील करिअरची दिशा ठरविण्यासाठी महत्त्वाची असलेली दहावीची परीक्षा मंगळवारी सकाळी अकरा वाजता मराठी विषयाच्या पेपरने सुरू झाली. उपकेंद्रांची नीट माहिती नसलेल्या परीक्षार्थींची त्यांचे केंद्र शोधण्यासाठी धावपळ झाली.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी कोल्हापूर विभागातून १,४३,५५८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील ५८,७९६ परीक्षार्थी आहेत. कोल्हापूरमध्ये १३५ परीक्षा केंद्रे आहेत. पहिलाच पेपर असल्याने सकाळी पावणेदहा वाजल्यापासून शहरातील प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, म. ल. ग. हायस्कूल, प्रायव्हेट हायस्कूल, तवन्नाप्पा पाटणे हायस्कूल, आदी परीक्षा केंद्रांवर परीक्षार्थींची गर्दी होऊ लागली.
परीक्षार्थींना तपासून आणि चप्पल, बूट, सॉक्स, बेल्ट बाहेर ठेवायला लावून त्यांना साडेदहा वाजता परीक्षा कक्षामध्ये प्रवेश देण्यात आला. त्यांच्यासह पर्यवेक्षक, कर्मचाऱ्यांना परीक्षा केंद्रांवर मोबाईल वापरण्यास बंदी राहिली. त्यांना १०.४० वाजता उत्तरपत्रिका, तर त्यानंतर दहा मिनिटांनी प्रश्नपत्रिका देण्यात आली.
अकरा वाजता पेपर लिहिण्यास सुरुवात झाली. दोन वाजता पेपर सुटल्यानंतर बहुतांश परीक्षार्थींच्या चेहऱ्यावर तो सोपा गेल्याचा आनंद दिसत होता. प्रश्नांची उत्तरे, वेळ कमी पडला, आदींबाबत आपले मित्र, मैत्रिणी आणि पालकांसमवेत चर्चा करीत त्यांनी परीक्षा केंद्र सोडले.
दरम्यान, परीक्षेच्या मुख्य केंद्रांतर्गत दोन ते तीन उपकेंद्र होती. प्रवेशपत्रावर मुख्य केंद्राची नोंद होती. तेच आपले परीक्षा केंद्र असल्याचे समजून सकाळी दहा ते सव्वा दहाच्या दरम्यान अनेक परीक्षार्थी, त्यांचे पालक हे मुख्य केंद्रांवर आले होते. त्याठिकाणी त्यांना दुसऱ्या केंद्रावर बैठक व्यवस्था असल्याचे समजल्यानंतर त्यांची धावपळ झाली. अधिकतर केंद्रांवर हे चित्र पाहायला मिळाले. केंद्रावर पोलीस बंदोबस्त होता.