परीक्षा तोंडावर; प्राध्यापक संपावर १० दिवसांपासून कॉलेज बंद : अनेक महाविद्यालयांचे अभ्यासक्रम अपूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 12:51 AM2018-10-05T00:51:56+5:302018-10-05T00:52:30+5:30
गेल्या १० दिवसांपासून सुरू असलेल्या प्राध्यापकांच्या बेमुदत कामबंद आंदोलनामुळे जिल्ह्यातील बहुतांश महाविद्यालयातील शिकविणे बंद झाले आहे. १८ दिवसांवर परीक्षा आली असून, अजूनही कला, वाणिज्य आणि विज्ञान विद्याशाखेतील सरासरी २० टक्के
कोल्हापूर : गेल्या १० दिवसांपासून सुरू असलेल्या प्राध्यापकांच्या बेमुदत कामबंद आंदोलनामुळे जिल्ह्यातील बहुतांश महाविद्यालयातील शिकविणे बंद झाले आहे. १८ दिवसांवर परीक्षा आली असून, अजूनही कला, वाणिज्य आणि विज्ञान विद्याशाखेतील सरासरी २० टक्के अभ्यासक्रम अपूर्ण आहे. शिवाजी विद्यापीठाचा युवा महोत्सव आणि आंतरविभागीय क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विद्यार्थी हित लक्षात घेऊन राज्य शासनाने या आंदोलनाबाबत लवकरात लवकर तोडगा काढणे आवश्यक आहे.
विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र फेडरेशन आॅफ युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स आॅर्गनायझेशन (एम्फुक्टो) आणि शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाच्या (सुटा) नेतृत्वाखाली प्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी एम्फुक्टाचे शिष्टमंडळ आणि उच्च शिक्षणमंत्री यांच्यातील चर्चा निष्फळ ठरली; त्यामुळे एम्फुक्टोने आंदोलनाची तीव्रता वाढविली.
या आंदोलनात सहभागी होणाऱ्या प्राध्यापकांची संख्या वाढत आहे. बहुतांश महाविद्यालयांतील कायमस्वरूपी प्राध्यापक आंदोलनात सहभागी झाल्याने तेथील तास होत नाहीत. एकंदरीतपणे या महाविद्यालयांतील शिकविणे बंद झाले आहे. १५ जुलैपासून पदवी अभ्यासक्रमांची महाविद्यालये सुरू झाली. त्यानंतर कामबंद आंदोलन सुरू होईपर्यंत विविध विषयांचा पहिल्या सत्रातील सरासरी ८० टक्के अभ्यासक्रम शिकविण्यात आला आहे.
शिवाजी विद्यापीठाकडून २३ आॅक्टोबरपासून कला आणि वाणिज्य, तर २९ आॅक्टोबरपासून विज्ञान विद्याशाखेच्या पहिल्या सत्राच्या परीक्षा सुरू होणार आहेत. कला, वाणिज्य अभ्यासक्रमांमध्ये१० गुणांसाठी सेमिनार आहेत. परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान १० दिवस आधी हे सेमिनार पूर्ण होणे आवश्यक आहेत; मात्र, प्राध्यापकआंदोलनात असल्याने सेमिनार घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यातच अजून २० टक्केअभ्यासक्रम शिकविणे बाकी असल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढत आहे.
‘सीएचबी’ प्राध्यापकांवर दबाव
कायम प्राध्यापक या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. त्यांना तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांनी (सीएचबी) बाहेरून पाठिंबा दिला आहे. काही महाविद्यालयांत तास घेण्यासाठी तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांवर (सीएचबी)
प्राचार्य आणि संस्थाचालक दबाव वाढत आहे.
विद्यापीठाकडून
परीक्षांची तयारी
पहिल्या सत्रातील परीक्षा २३ आॅक्टोबरपासून सुरू होणार आहेत. प्राध्यापकांच्या कामबंद आंदोलनात परीक्षाविषयक कामकाजावर बहिष्कार नसल्याचे पत्र ‘एम्फुक्टो’ ने दिले आहे; त्यामुळे परीक्षा केंद्रांंची निश्चिती, उत्तरपत्रिकांची छपाई, आदी स्वरूपातील तयारी सुरू असल्याचे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी सांगितले.
विद्यापीठ कार्यक्षेत्रातील १७४८ प्राध्यापकांचा सहभाग
या आंदोलनात शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील १३३ अनुदानित महाविद्यालयांतील एकूण १७४८ प्राध्यापक सहभागी आहेत. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ६०२, साताºयातील ६४० आणि सांगलीतील ५०६ प्राध्यापक आहेत, अशी माहिती कोल्हापूर विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. अजय साळी यांनी दिली.