परीक्षक, परिनियामक नेमणुकीचे ‘अॅटोमेशन’
By Admin | Published: January 6, 2015 10:38 PM2015-01-06T22:38:43+5:302015-01-06T23:59:06+5:30
शिवाजी विद्यापीठ : पात्र प्राध्यापकांना मिळणार संधी; परीक्षा विभागाचे पाऊल
संतोष मिठारी - कोल्हापूर -प्रश्नपत्रिका तयार करणे, उत्तरपत्रिकांची तपासणी करणे अथवा परिनियामक म्हणून काम करणारी वर्षानुवर्षे दिसणारी विद्यापीठ पातळीवरील तीच-तीच नावे
हद्दपार होणार आहेत. महाराष्ट्र विद्यापीठे कायद्यातील मार्गदर्शक तत्त्वानुसार पात्र आणि लायक असलेल्या प्राध्यापकांना देखील परीक्षाविषयक संबंधित कामे करण्याची आता संधी मिळणार आहे. त्यादृष्टीने शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने परीक्षक, परिनियामक, आदींच्या नेमणुकीचे ‘अॅटोमेशन’ (स्वयंचलित) करण्याचा उपक्रम राबविला. त्याची सुरुवात मार्च-एप्रिलच्या परीक्षेपासून होणार आहे.
विद्यापीठात विद्याशाखांनिहाय अभ्यास मंडळे कार्यरत आहेत. प्रश्नपत्रिका तयार करणे, उत्तरपत्रिकांची तपासणी करणे, आदींसाठी प्राध्यापकांची परीक्षक म्हणून नेमणूक करण्याचे काम अभ्यास मंडळांच्या माध्यमातून होते. परीक्षाविषयक कामात वर्षानुवर्षे तीच-तीच नावे अनेक विद्याशाखांमध्ये असल्याच्या तक्रारी काही प्राध्यापकांकडून होत आहेत. अनेकदा इच्छा, तयारी असूनदेखील बहुतांश प्राध्यापकांना काम करण्याची संधी मिळत नसल्याचे अनेक प्राध्यापकांचे म्हणणे आहे.
ते लक्षात घेऊन विद्यापीठ कायदा १९९४ मधील ३२ (५) च्या मार्गदर्शक तत्त्वांना छेद न देता परीक्षक, परिनियामक, आदींच्या नेमणुकीचे ‘अॅटोमेशन’ परीक्षा विभागातर्फे केले जाणार आहे. यामुळे विद्यापीठ कार्यक्षेत्रातील पात्र, लायक प्राध्यापकांना परीक्षाविषयक काम करण्याची संधी मिळणार आहे. शिवाय ‘अॅटोमेशन’मुळे संबंधितांशी पत्रव्यवहार करणे, त्यांना परीक्षाविषयक कामाच्या आॅर्डर्स देण्यासाठी विद्यापीठात बोलाविणे, आदींबाबत खर्च होणारा वेळ आणि पैशांची बचत होणार आहे.
अशी होणार नेमणूक...
यात पहिल्यांदा विद्यापीठाचा परीक्षा विभाग सॉफ्टवेअरच्या माध्यमातून महाविद्यालय व संस्थांकडून पात्र प्राध्यापकांची नावे ‘आॅनलाईन’ घेणार आहे. त्यांच्या विद्याशाखा, ई-मेल, मोबाईल, आदी स्वरूपातील ‘डाटाबेस’ तयार केला जाईल. पात्र प्राध्यापकांची यादी तयार झाल्यानंतर त्यास अभ्यास मंडळाच्या अध्यक्षांची मान्यता घेतली जाईल. त्यानंतर हे अध्यक्ष परीक्षाविषयक कामांसाठी त्यातून प्राध्यापकांची नावे निवडून ते प्र-कुलगुरूंकडे ई-मेलद्वारे पाठवतील. त्यांनी मान्यता दिल्यानंतर परीक्षाविषयक कामासाठीची नेमणूक, त्याची माहिती एका क्षणात ई-मेल आणि एसएमएसद्वारे संबंधित प्राध्यापकाला मिळणार आहे.
सध्याच्या प्रश्नपत्रिका छपाईत कागद ‘वेस्ट’ होतो. ते टाळण्यासाठी ज्या परीक्षा केंद्रांवर जितक्या प्रश्नपत्रिका लागणार आहेत, त्यांची इनव्हेंटरी तयारी करून थेट विद्यापीठाच्या प्रेसमधून परीक्षा केंद्रांवर पोहोचविण्यात येणार आहेत. सत्रानुसार पेपरना कोड नंबर दिले जातील. कोड नंबरनुसारच पेपर प्रेसला पाठविण्यात येतील. ‘स्ट्राँग’ रूममधील गोपनीयता अधिक वाढविण्याच्या दृष्टीने या नव्या पद्धतीचा वापर केला जाणार आहे. विद्यापीठाकडून वर्षभरात ५०० परीक्षा घेतल्या जातात. त्यांच्या पेपरकोडची संख्या पाच हजार होते. ते लक्षात घेता संबंधित नवी पद्धती अधिक उपयुक्त ठरणारी आहे.
- महेश काकडे (परीक्षा नियंत्रक, शिवाजी विद्यापीठ)