मनकर्णिका कुंडाचे १५ दिवसांनंतर उत्खनन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 04:53 PM2020-05-15T16:53:01+5:302020-05-15T16:56:13+5:30
अंबाबाई मंदिर परिसरातील मनकर्णिका कुंडाच्या उत्खननास १५ दिवसांनंतर सुुरुवात होणार आहे. सध्या येथील झाडे काढून तेथील बांधकाम हटविण्यात येत आहे. उत्खननाची निविदा प्रक्रिया पार पाडून प्रत्यक्ष काम सुरू करण्यास जून महिना उजाडणार आहे.
कोल्हापूर : अंबाबाई मंदिर परिसरातील मनकर्णिका कुंडाच्या उत्खननास १५ दिवसांनंतर सुुरुवात होणार आहे. सध्या येथील झाडे काढून तेथील बांधकाम हटविण्यात येत आहे.
उत्खननाची निविदा प्रक्रिया पार पाडून प्रत्यक्ष काम सुरू करण्यास जून महिना उजाडणार आहे.
दरम्यान, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची लॉकडाऊनमुळे थांबलेली मंदिरे व जमिनींचा सर्व्हे, स्ट्रक्चरल ऑडिट, जोतिबा मंदिर दर्शन मंडप ही कामे पुन्हा सुरू करण्यात येत आहेत.
देवी अंबाबाईच्या स्नानाचे पाणी जिथे जाते त्या मनकर्णिका कुंडाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी देवस्थान समितीने पुरातत्त्व खात्याकडे परवानगी मागितली होती.
ती मिळाल्यानंतर समितीने येथील झाडे तोडण्यासाठी निविदा प्रसिद्ध केली. त्यानंतर पुढील काही दिवसांत लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे येथील उत्खननासह देवस्थान समितीची सुरू असलेली सगळी विकासकामे थांबवण्यात आली. मात्र दोन आठवड्यांपूर्वी लॉकडाऊन शिथिल झाल्याने समितीने पुन्हा कामांना सुरुवात केली आहे.
त्याअंतर्गत परिसरातील झाडे तोडण्यात आली आहेत. येथे पूर्वी झालेले स्वच्छतागृहांचे बांधकाम, कट्टे, भराव हे सगळे काढून हा परिसर जमिनीलगत करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली.
उत्खननासाठी शासकीय नियमानुसार निविदा प्रक्रिया करावी लागते; त्यामुळे टेंडर नोटीस काढणे, त्यासाठी अर्ज येऊन एकाची निवड करणे व प्रत्यक्ष वर्क ऑर्डर काढणे या सगळ्या प्रक्रियेला किमान १५ दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक कामगारांकडून हे काम करून घेतले जाईल. पुढे पावसाळा असल्याने त्याआधी अधिकाधिक भराव काढून टाकण्याचा समितीचा मानस आहे.
समितीने सुरू केलेली कामे
- जोतिबा येथील दर्शन मंडपाचे बांधकाम
- अखत्यारीतील मंदिरे व जमिनींचे सर्वेक्षण
- मंदिराच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल
- ताराबाई रोड येथील साडेतीन हजार स्क्वेअर फूट जागेवर सातमजली भक्त निवास बांधण्यासाठीची निविदा प्रक्रिया.