Kolhapur: कारवाईला न जुमानता जोतिबा डोंगरावरील गायमुखाजवळ उत्खनन, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 14:13 IST2024-12-16T14:12:28+5:302024-12-16T14:13:11+5:30
जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी, उत्खनानाचे पुरावे सादर

Kolhapur: कारवाईला न जुमानता जोतिबा डोंगरावरील गायमुखाजवळ उत्खनन, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
कोल्हापूर : जोतिबा डोंगराच्या पायथ्याशी गायमुखाजवळ अनधिकृत गौणखनिज उत्खनन केल्याप्रकरणी हैदराबाद येथील मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रा. प्रा. लि. कंपनी दंडात्मक कारवाईला न जुमानता रविवारी पुन्हा उत्खनन करीत होती. यासंबंधी पुराव्यानिशी प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे कंपनीस उत्खनन बंद करण्याच्या सूचना दिल्या.
कोल्हापूर - रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गासाठी गौणखनिजची आवश्यक आहे. यासाठी गायमुखाजवळ ठेकेदार कंपनी उत्खनन करीत आहे. जिल्हा खाणकाम योजनेत समाविष्ट असलेल्या गटातच कंपनी उत्खनन करीत आहे, असे पन्हाळा तहसील प्रशासनाने म्हणणे आहे. दरम्यान, ‘प्रजासत्ताक’चे अध्यक्ष देसाई यांनी यावर आक्षेप घेतला. बेसुमार आणि बेकायदेशीरपणे उत्खनन सुरू आहे. उत्खननाने डोंगर खचून जोतिबा मंदिरास धोका आहे, अशी तक्रार त्यांनी केली होती. त्याची दखल घेऊन तहसीलदार शिंदे यांनी तलाठीकरवी पंचनाम केला. यामध्ये १५० ब्रास माती, मुरूम गौणखनिज अनधिकृत उत्खनन केलेल्याचे स्पष्ट झाले.
यामुळे कंपनीस ९ लाख १५ हजार रूपयांचा दंड भरून घेतला. दंड भरून कंपनी रविवारी त्याच ठिकाणी उत्खनन सुरू केले होते. तक्रारदार देसाई यांनी याचे फोटो, व्हिडीओसह जिल्हाधिकारी यांच्याकडे ई- मेलद्वारे तक्रार केली. कंपनीने उत्खनन करणे बंद केले आहे. यानिमित्ताने पन्हाळा तालुक्यातील बेकायदेशीर उत्खननचे प्रकरण चव्हाट्यावर आले आहे.
प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्या संगनमताने..
प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्या संगनमतामुळे गायमुखजवळ बेकायदेशीर उत्खनन सुरू आहे. यामुळे शासनाचे नुकसान होत आहे, अशी तक्रार देसाई यांनी केलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे. उत्खननप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल, तरीही उत्खनन
देसाई यांनी पहिल्यांदा तक्रार केल्यानंतर १० डिसेंबर रोजी प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दखल घेऊन कार्यवाहीचा अहवाल आठ दिवसांत अहवाल देण्याचा आदेश प्रांताधिकारी, तहसीलदार यांना दिले. यानंतर ११ डिसेंबर रोजी तहसीलदार शिंदे यांनी उत्खनन करणाऱ्या कंपनीस दंड करून अहवाल पाठवला. प्रशासनाच्या या दंडात्मक कारवाईला केराची टोपली दाखवत कंपनी रविवारी उत्खननाचे धाडस केले, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
जोतिबा डोंगराच्या पायथ्याशी गौणखनिज उत्खननप्रकरणी दोषी मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रा. प्रा. लि. कंपनीस दंडात्मक कारवाई केली आहे. तरीही, या कंपनीकडून रविवारी उत्खनन होत असल्याची तक्रारी झाली. त्यानंतर तातडीने उत्खनन बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कंपनीने पुन्हा उत्खनन केल्याने त्यांच्यावर कारवाई होईल. - माधवी शिंदे, तहसीलदार, पन्हाळा.