इचलकरंजीत नवीन रस्ते खुदाई सुरूच

By admin | Published: May 17, 2017 11:16 PM2017-05-17T23:16:35+5:302017-05-17T23:16:35+5:30

नागरिकांतून तीव्र संताप : संबंधितांवर कारवाई होत नसल्याने प्रकार वाढले; प्रशासन गप्पच

Excavation of new roads in Ichalkaranji | इचलकरंजीत नवीन रस्ते खुदाई सुरूच

इचलकरंजीत नवीन रस्ते खुदाई सुरूच

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शहरामध्ये नव्याने केलेले रस्ते खुदाईचे काम बुधवारी तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. शहरातील मुख्य असणाऱ्या छत्रपती शिवाजी पुतळा चौकात गळती काढण्याच्या नावाखाली खुदाई करण्यात येत आहे. याबाबत वृत्तपत्रांतून आवाज उठवूनही नगरपालिका प्रशासन, पालिकेतील कारभारी अथवा लोकप्रतिनिधी कोणीच काही बोलायला तयार नाहीत. सर्वजण मूग गिळून गप्प बसल्याने यामागे काय गौडबंगाल आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शहरामध्ये नवीन रस्ते केल्यानंतर पंधरा दिवसांतच शाहू पुतळ्याजवळ रस्ता खुदाई केली होती. या ठिकाणी पाच दिवस पाईपलाईनचे काम सुरू होते. त्यावेळीही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. रविवारी (दि. १४) बीएसएनएल कार्यालयासमोरचा नवीन रस्ता शौचालय ड्रेनेजला जोडण्यासाठी म्हणून खुदाई केला. मंगळवारी (दि. १६) गुरुकन्नननगर व हिरकणी हॉटेलजवळ पाण्याच्या पाईपलाईनचा व्हॉल्व्ह सापडत नसल्याने खुदाई केली.
खारुडेकर वखार, दातार मळा येथे नवीन नळ जोडणीसाठी खुदाई, संत मळा येथे व्हॉल्व्ह रस्त्यापासून वर घेण्यासाठी खुदाई केली. खुदाईवेळी काही ठिकाणी कामगारांनी उद्धट उत्तरे देत ‘आमच्या मालकाने (मक्तेदार) नियोजन लावले आहे. फोटो काढून छापला तरी काही फरक पडत नाही’, असा वाद घातला. तो खरा ठरल्याप्रमाणे बुधवारी पुन्हा छत्रपती शिवाजी पुतळ्याजवळ खुदाई सुरू झाली आहे. हा प्रकार नेमका किती दिवस चालणार? शहरातील अन्य काही ठिकाणीही गळती लागल्याचे समजते. तेथेही पालिका खुदाई सुरू करणार का? मग सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ते करण्यापूर्वी जाहीर केलेल्या आवाहनाचे काय? ड्रेनेज व पाईपलाईनची कामे रस्ता करण्यापूर्वीच करून घेण्याची सूचना असतानाही नवीन रस्ता खुदाई का? मोर्चे, आंदोलने झाल्यानंतरच पालिका, प्रशासन, लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देणार आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहेत.


सोशल मीडियावरून रस्ता खुदाईवर टीका
शहरातील रस्ता खुदाईचे छायाचित्र काढून ते सोशल मीडियावरून सर्वत्र पसरवून त्यावर टीका करण्यात येत आहेत. त्यामध्ये नगरपालिकेच्या तिन्ही बाजूने खुदाई करण्यासाठी निवेदन द्यावे. कारण नगरपालिकेच्या लोकांना खुदाई झालेला रस्ता बघितल्याशिवाय जमत नाही. चांगला रस्ता बघवत नाही. नवीन रस्ता केल्यानंतर नळ जोडणी घेणाऱ्या नागरिकांचा सत्कार करा. सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपालिकेचे ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ अशी भूमिका, अशा अनेक टीका सोशल मीडियावर फिरत आहेत.

नवीन रस्ता खचला : चांदणी चौक ते मरगुबाई मंदिर हा रस्ता ड्रेनेज असलेल्या दोन ठिकाणी खचला आहे. कच्च्या ड्रेनेजवरच घाईगडबडीने रस्ता केल्यामुळे तो खचला असण्याची शक्यता असून, अपघाताला निमंत्रण मिळत आहे.

Web Title: Excavation of new roads in Ichalkaranji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.