राष्ट्रीय महामार्गावरच्या खड्ड्यांवर पॅचवर्कचा उतारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 04:09 PM2020-08-20T16:09:20+5:302020-08-20T16:10:48+5:30
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कागल ते उजळाईवाडी उड्डाणपूल येथेपर्यंतचा प्रवास खड्ड्यांमुळे धोक्याचा बनला आहे. एक ते दीड फुटाचे खोल खड्डे पडल्याने वाहने जोरात आदळत आहेत.
कोल्हापूर: पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कागल ते उजळाईवाडी उड्डाणपूल येथेपर्यंतचा प्रवास खड्ड्यांमुळे धोक्याचा बनला आहे. एक ते दीड फुटाचे खोल खड्डे पडल्याने वाहने जोरात आदळत आहेत. पावसाचा जोर ओसरल्याने राज्य रस्ते विकास महामंडळाकडून पॅचवर्क करण्याचे काम सुरू करण्यात आले. यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी पॅचवर्कचा दर्जा पाहता आणखी एक-दोन मोठ्या पावसांतच ते पुन्हा उखडण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील कागल ते उजळाईवाडी येथपर्यंत जवळपास १२ ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. कर्नाटकच्या हद्दीतून महाराष्ट्रात प्रवेश केल्यानंतर दूधगंगा नदीच्या पुलापासून खड्ड्यांचे दर्शन सुरू होते. आरटीओ चेकपोस्ट नाक्यासमोर तर या खड्ड्याने अपघातही घडला आहे. तसेच पुढे आल्यावर कागल मध्यवर्ती बसस्थानकाजवळच्या बोगद्यावरील आणि त्याच्या पुढे गेल्यावर अखिलेश पार्कच्या समोर तर खड्ड्यांमुळे झालेली चाळण पाहिली की हा राष्ट्रीय महामार्ग आहे की गल्लीतील रस्ता असा प्रश्न पडावा असे चित्र आहे.
कागलजवळ लक्ष्मी टेकडीसमोर असलेला खड्डा तर वाहन जोरात आदळल्यानंतरच दिसतो. तीच परिस्थिती पुढे कणेरीवाडी, गोकुळ शिरगाव आणि सुदर्शन पेट्रोल पंपासमोर आहे. वाहन चालवताना खड्डे चुकवण्याची कसरत करावी लागते.
दर उन्हाळ्यात महामार्गाची डागडुजी होते; पण यावर्षी लॉकडाऊनमुळे केवळ साईटपट्ट्या भरण्याचे काम झाले. रस्त्यांचे डांबरीकरण झालेच नाही. शिवाय पाणी वाहून जाण्यासाठी मोऱ्यांची दुरुस्तीही झाली नाही. त्यामुळे आठ दिवसांच्या पावसातच महामार्गावरील पाण्याचा निचरा व्यवस्थित न झाल्याने खड्डे पडण्यास सुुरुवात झाली.
कागल, एमआयडीसी पूल, गोकुळ शिरगाव, सुदर्शन पेट्रोल पंप, मयूर पंप या ठिकाणी रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहतात. यातून रस्ते खराब होत आहेत. बुधवारी या रस्त्यावर डांबर-खडीचे मिश्रण टाकून ते तात्पुरते भरण्याचे काम सुरू होते; पण त्याचा दर्जा पाहता ते आणखी दोन पावसांतच पूर्णपणे उखडून जाण्याची शक्यता आहे.