वंचितांना ज्ञानदान करणारी उत्तूर केंद्रशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 11:55 PM2019-06-02T23:55:44+5:302019-06-02T23:55:48+5:30

रवींद्र येसादे । लोकमत न्यूज नेटवर्क उत्तूर : तळागाळातील वंचितही शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध व्हावा, यासाठी महात्मा जोतिबा फुले यांनी शैक्षणिक ...

Excellent Center Center | वंचितांना ज्ञानदान करणारी उत्तूर केंद्रशाळा

वंचितांना ज्ञानदान करणारी उत्तूर केंद्रशाळा

Next

रवींद्र येसादे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
उत्तूर : तळागाळातील वंचितही शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध व्हावा, यासाठी महात्मा जोतिबा फुले यांनी शैक्षणिक चळवळ सुरू केली. तोच उद्देश साध्य करण्यासाठी बावीस खेड्यांचे मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या आजरा तालुक्यातील उत्तूर येथे स्वातंत्र्यपूर्वकाळात १८ डिसेंबर १९७० यावर्षी शाळेची स्थापना करण्यात आली. आज या जिल्हा परिषदेच्या केंद्रशाळेची वाटचाल दीड शतकाकडे सुरू आहे. वंचित घटकातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे बहुमोल कार्य या केंद्रशाळेने आतापर्यंत केले आहे. तसेच स्वातंत्र्यपूर्वकाळापासून ते आतापर्यंत शाळेची गुणवत्ता टिकवून ठेवण्याचे काम शिक्षकांनी उत्तमरीत्या पार पाडले आहे.
ही शाळा जेथे रिकामे घर तेथे भरत असे. मुले शिकली पाहिजेत हा दृष्टिकोन समोर ठेवून ग्रामस्थ शाळेसाठी विनामोबदला घरे देत. पागार गल्लीतील चौंडेश्वरी मंदिर, महादेव मंदिर, गावांतील मठ, आदी ठिकाणी शाळा भरत असे.
मुला-मुलींची एकत्र असणारी ही शाळा कालांतराने स्वातंत्र्योत्तर काळानंतर जि.प.ची मंजुरी मिळाल्यानंतर कन्या विद्यामंदिर व कुमार विद्यामंदिर या नावाने वेगवेगळ््या ठिकाणी सुरू झाल्या. कुमार विद्यामंदिर झेंडे-पाटील यांच्या घरासमोर जिल्हा परिषदेने बांधून दिलेल्या खोल्यांत, तर कन्या शाळा ग्रामपंचायतीच्या मागे (खंदक) येथे सुरू झाली.
स्वातंत्र्यपूर्वकाळातील एकमेव शाळा, तसेच दर्जेदार शिक्षण मिळत असल्याने या शाळेकडे विद्यार्थ्यांचा अधिक ओढा होता. क्वचितप्रसंगी इंग्रजी माध्यमासाठी मुले गडहिंग्लज येथे जात असत अन्यथा उत्तूर येथेच शिक्षण घेत. राज्यात केंद्रशाळांची निर्मिती झाल्यानंतर या शाळेचे स्वरूपच बदलून गेले. मुलांची शाळा केंद्रीय शाळा बनली. बहिरेवाडी, मुमेवाडी, पेंढारवाडी, आर्दाळ, करपेवाडी, चव्हाणवाडी, झुलपेवाडी, बेलेवाडी व उत्तूर येथील खासगी, प्राथमिक व माध्यमिक शाळांचे ही शाळा एक केंद्रस्थान बनून गेली.
स्पर्धात्मक युगात शाळा टिकली पाहिजे यासाठी शिक्षकांनी केलेले योगदान आजअखेर कायम आहे. शाळेतून इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर येथील माजी विद्यार्थी वकील, डॉक्टर, अभियंता बनले आहेत, तर काही प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत. सध्या केंद्रशाळा ही ग्रामपंचायतीमागे असणाºया (खंदक) येथे स्थलांतरित केली आहे. भौतिक सुविधा, ई- लर्निंग, आदी सुविधांनी शाळा सुसज्ज आहे. शाळेचा गतवर्षीचा पट १४८ इतका झाला आहे.
राज्य गुणवत्ता यादीत आजअखेर ५६ विद्यार्थी गुणवत्ताधारक बनल्याने शाळेचे नाव राज्यस्तरावर चमकले आहे. शाळेने ‘शिष्यवृत्तीधारक शाळा’ असा नावलौकिक केल्याने येथे शिक्षण घेण्याकडे विद्यार्थ्यांचा ओढा अधिक आहे. या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक संजय पोवार, संतोष शिवणे, प्रशांत पाटील, नीलिमा पाटील, आदी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
२०२० मध्ये होणार दीडशतक पूर्ण
या शाळेतील शिक्षक दरवर्षी १८ डिसेंबर हा शाळेचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हिरिरीने भाग घेतात. पहाटे पाचच्या सुमारास गावातून प्रभात फेरी काढून शाळेच्या प्रांगणात ध्वजारोहण मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन यांच्या हस्ते केले जाते. केंद्रशाळा अंतर्गत सर्व शाळा सहभागी होतात. १८ डिसेंबर २०२० ला शाळेस दीडशे वर्षे पूर्ण होत आहेत.
शाळा मंजुरीसाठी कै. मुकुंदराव
दादा आपटेंचे योगदान
मंदिर, मठानंतर रिकामे घर तेथे शाळा भरायची. शाळेस जि.प.ची मंजुरी नव्हती. कै. मुकुंदराव दादा आपटे यांनी कन्या व कुमार या शाळांना मंजुरीसाठी प्रयत्न केले. यास यश येत या शाळांना मंजुरी मिळाली. मग जि.प. च्या जागेत या शाळा स्थिरावू लागल्या. याकामी आपटे यांचे योगदान मोठे आहे.
माजी विद्यार्थी राष्ट्रपती
पदक विजेते
शाळेचे माजी विद्यार्थी दत्तात्रय मुळीक हे पुढे शिक्षक बनून शाळेत आले. ज्ञानदानाचे कार्य करताना त्यांनी अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना घडविले. त्यांच्या या कार्याची देशपातळीवर दखल घेऊन त्यांना राष्ट्रपती पदक देऊन गौरविण्यात आले आहे.
‘शिष्यवृती’त भरघोस यश
गेल्या दहा वर्षांत शाळेचा प्रगतीचा आलेख उंचावला आहे. योग्य मार्गदर्शनामुळे राज्यस्तरावर शाळेचे विद्यार्थी शिष्यवृतीधारक बनलेत. ही शाळा शिष्यवृत्तीची शाळा म्हणून लौकिकास पात्र ठरली आहे.

Web Title: Excellent Center Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.