मंत्रालयातून बोलतोय; उत्कृष्ट सरपंच पुरस्कार जाहीर झालाय.. तत्काळ ५० हजार पाठवा; सरपंचांना येताहेत फोन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 05:39 PM2023-02-15T17:39:08+5:302023-02-15T17:41:04+5:30
राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार व स्वनिधी म्हणून २५ लाख रुपये मिळणार आहेत. त्यासाठी खर्च म्हणून ५० हजार रुपये माझ्या गुगल पे नंबरवर पाठवा
रमेश सुतार
गणेशवाडी (कोल्हापूर) : मी मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागामधून सचिव बोलतोय, तुमचं नाव राजीव गांधी उत्कृष्ट सरपंच पुरस्कारांसाठी निवडले असून तुम्हाला शासनाच्यावतीने पुरस्कार व रोख रक्कम २५ लाख रुपये मिळणार आहेत. तुमची फाईल तयार आहे. माझ्या गुगल पे नंबरवर ५० हजार रुपये पाठवा, असे फोन गावोगावच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंचांना येत आहेत. शिरोळ तालुक्यातील अनेक सरपंचांनाही असे फोन आले आहेत.
औरवाडचे लोकनियुक्त सरपंच शफी पटेल यांना मोबाईल (क्रमांक ८६९८७८२७१०) वरून फोन आला. हा फोन माने नावाने नोंद आहे. त्यात मी सामान्य प्रशासन विभागामधून बोलतोय शिरोळ तालुक्यातील २६ पैकी तीन गावांतील सरपंचांची नावे राजीव गांधी उत्कृष्ट सरपंच पुरस्कारांसाठी निवडली आहेत. त्यात औरवाडमधून तुमची निवड झाली आहे. तुमचा प्रस्ताव आमच्याकडे अगोदरच्याच सरपंचांनी दिला आहे. तुम्हाला राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार व स्वनिधी म्हणून २५ लाख रुपये मिळणार आहेत. त्यासाठी खर्च म्हणून ५० हजार रुपये माझ्या गुगल पे नंबरवर पाठवा, असे सांगण्यात आले.
सरपंच पटेल यांनी पुरस्काराबद्दल अधिक चौकशी केल्यावर त्या व्यक्तीने टाळाटाळ केली. त्यामुळे पटेल यांना शंका आली. त्यांनी ग्रामसेवक बी. एन. केदार यांना विचारणा केली असता पुरस्कारासंदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडून कोणत्याही सूचना अथवा पत्र आले नसल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये माहिती घेतली असता राज्य शासनाकडून असा कोणताही पुरस्कार दिला जात नसल्याचे स्पष्ट झाले. याअगोदरही तालुक्यातील सरपंचांची पुरस्कार देतो म्हणून फसवणूक झाली आहे. मात्र, बदनामीमुळे कोणी सांगण्यास पुढे आलेले नाही.
राज्य शासन पुरस्कारांसाठी कधीही पैशांची मागणी करत नाही. त्यामुळे खात्री केल्याशिवाय अशा फोन कॉलना प्रतिसाद देऊ नका. फसवणुकीपासून सावध रहा. - शंकर कवितके, गटविकास अधिकारी, शिरोळ, जि.कोल्हापूर