‘गोकुळ’ वगळता जिल्ह्यातील ४,९८२ संस्थांच्या निवडणुका लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:25 AM2021-04-07T04:25:55+5:302021-04-07T04:25:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) वगळता जिल्ह्यातील ४,९८२ सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) वगळता जिल्ह्यातील ४,९८२ सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर गेल्या आहेत. राज्य सरकारने ३१ ऑगस्टपर्यंत निवडणुकांना मुदतवाढीचा निर्णय घेतला आहे. मार्च २०२१ पर्यंत ४,९८२ संस्था निवडणुकीस पात्र आहेत, ऑगस्टअखेर आणखी तीनशे ते चारशे संस्था पात्र होणार असल्याने या सगळ्या संस्थांच्या निवडणुका घेणे सहकार विभागापुढे मोठेच आव्हान आहे.
डिसेंबर २०१९ पासून महात्मा जोतीराव फुले शेतकरी सन्मान योजना (कर्जमाफी) व त्यानंतर कोरोनाच्या संकटामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुुका लांबणीवर टाकल्या होत्या. गेल्या सव्वावर्षात सात वेळा संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. कोरोनाचे रुग्ण वाढत राहिल्याने २४ फेब्रुवारी २०२१ रोजी मार्च २०२१ पर्यंत निवडणुका लांबणीवर टाकल्या होत्या. सध्या राज्यात कोरोनाची परिस्थिती भयावह असल्याने राज्य सरकारने ऑगस्ट २०२१ पर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. यामध्ये उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक प्रक्रिया सुरू असलेल्या संस्था मात्र यातून वगळण्यात आल्या आहेत. ‘गोकुळ’ दूध संघाची निवडणूक उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुरू असल्याने ही संस्था वगळून जिल्ह्यातील तब्बल ४,९८२ संस्थांच्या निवडणुका पाच महिने लांबणीवर टाकल्या गेल्या आहेत.
‘गोकुळ’ची सुनावणी उद्या शक्य
कोरोनामुळे ‘गोकुळ’ची निवडणूक लांबणीवर टाकावी, यासाठी सत्तारूढ गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर उद्या, गुरुवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. या सुनावणीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
मार्च २०२१ अखेर जिल्ह्यातील निवडणुकीस पात्र संस्था अशा...
‘अ’ वर्ग (जिल्हा बँक व साखर कारखाने)- ६
सूतगिरणी- ११
‘ब’ दूध संस्था व इतर- १,४९२
‘क’ वर्ग- २,३२८
‘ड’ वर्ग- १,१८१