जिल्ह्यात ऊसाचे हेक्टरी १० टन जादा उत्पादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:23 AM2020-12-24T04:23:16+5:302020-12-24T04:23:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : यंदा पाऊस चांगल्या राहिल्याने उसाचे उत्पादन अधिक होणार आहे. शिरोळ व हातकणंगले तालुक्यांतील काही ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : यंदा पाऊस चांगल्या राहिल्याने उसाचे उत्पादन अधिक होणार आहे. शिरोळ व हातकणंगले तालुक्यांतील काही गावेवगळता उर्वरित जिल्ह्यांत आडसाली लागणीला सरासरी हेक्टरी दहा टनाने उत्पादकतेत वाढ झाली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात या हंगामात १६० लाख टन उसाचे गाळप उद्दिष्ट पार करण्याची शक्यता आहे.
मागील हंगामात महापुरामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यातही अनेक दिवस ऊस पाण्याखाली राहिल्याने उत्पादकतेत मोठी घट झाली होती. शेतकऱ्यांचे नुकसान झालेच, त्याचबरोबर साखर कारखान्यांची उद्दिष्ट पार करताना दमछाक झाली होती. यंदा उसाचे क्षेत्र जास्त आहे, त्यात उन्हाळ्यामध्ये पुरेसे पाणी मिळाले आणि पावसाळ्यात उसाला पोषक असाच पाऊस राहिल्याने वाढ जोमात झाली. त्यामुळे यंदा कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने १६० लाख टन गाळपाचा टप्पा पार करतील, असा अंदाज हंगामापूर्वीच व्यक्त केला होता.
हंगाम सुरू होऊन सरासरी ४५ दिवस झाले आहेत. जिल्ह्यातील २२ साखर कारखान्यांनी ५५ लाख १८ हजार ४०२ टन उसाचे गाळप करत ६१ लाख ११ हजार ८७३ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. जिल्ह्यातील पश्चिमेकडील तालुक्यात उसाच्या उत्पादनात वाढ झाल्याचे दिसते. आडसाल लागणीला सरासरी हेक्टरी दहा टन जादा ऊस मिळत आहे. शिरोळ व हातकणंगले तालुक्यांतील काही गावांत मात्र उत्पादकता वाढीचे हे प्रमाण कमी दिसत आहे. ऑक्टोबरअखेर राहिलेला परतीचा पाऊस व पाणथळ जमिनीमुळे उसाच्या मुळातील ओल कमी न झाल्याने वजन अपेक्षित मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे.
जिल्ह्यातील हेक्टरी उसाचे उत्पादन असे-
ऊस उत्पादन
आडसाल लागण ९० ते १०० टन
सुरू लागण ७० ते ७५ टन
खोडवा ६० ते ७० टन
उताऱ्यात ‘बिद्री’ अव्वल
जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा १०.७८ टक्के आहे. अद्याप आडसाल लागणीचे गाळप मोठ्या प्रमाणात असल्याने उतारा कमी आहे. त्यात अनेक कारखान्यांने ‘बी. हेव्ही’ मोलॅसिस काढत असल्याने उतारा कमी दिसत आहे तरीही ‘बिद्री’ साखर कारखान्याची सर्वाधिक १२.१८ टक्के आहे.
कोट-
मागील हंगामापेक्षा यंदा उसाचे उत्पादन चांगले मिळत आहे. पूर्वेकडील तालुकेवगळता उर्वरित जिल्ह्यात हेक्टरी टनाने वाढ दिसत असल्याने उद्दिष्टापर्यंत सर्वच कारखाने मजल मारतील.
- विजय औताडे (साखर उद्योगातील तज्ज्ञ)
- राजाराम लोंढे