करवीरनिवासीनी अंबाबाई सुवर्ण पालखी शुद्धीकरण सोहळा उत्साहात

By admin | Published: March 18, 2017 03:19 PM2017-03-18T15:19:57+5:302017-03-18T15:19:57+5:30

विधीवत धार्मिक पुजेत देवीची उत्सवमूर्ती स्थानापन्न

Excitement of Ambavai Gold Palkhi Purification ceremony of Karviriani | करवीरनिवासीनी अंबाबाई सुवर्ण पालखी शुद्धीकरण सोहळा उत्साहात

करवीरनिवासीनी अंबाबाई सुवर्ण पालखी शुद्धीकरण सोहळा उत्साहात

Next

आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर : महालक्ष्मी सुवर्ण पालखी ट्रस्टच्यावतीने २६ किलो सोन्याचा वापर करुन बनविण्यात आलेल्या करवीर निवासीनी अंबाबाई देवीच्या सुवर्ण पालखी चा शुद्धीकरण सोहळा शनिवारी मोठ्या उत्साहात झाला. वेदमूर्ती सुहास जोशी यांच्या मार्गदर्शनाखालीव ट्रस्टचे अध्यक्ष खासदार धनंजय महाडीक यांच्या उपस्थितीत विविध विधी झाले.
गेल्या दोन वर्षांपासून करवीरनिवासीनी अंबाबाई देवीची पालखी सोन्यात करण्यात करण्याचा संकल्प महालक्ष्मी सुवर्ण पालखी ट्रस्टने केला होता. यात अगदी एक ग्रॅम ते एक किलो सोने भाविकांनी या ट्रस्टकडे दान केले. त्यातून येथील कारागीर गणेश चव्हाण, महेश चव्हाण, योगेश चव्हाण, अभिजीत चव्हाण यांनी अथक परिश्रमातून २६ किलो सोन्यापासून पालखी बनविली. या सुवर्ण पालखीचा शुद्धीकरण सोहळा शनिवारी आयोजित केलेला होता. हा सोहळा सकाळी ७:३० वाजल्यापासून सुरु झाला. यात प्रथम आचमन,पुण्याहवाचन , अभिषेक आदी धार्मिक विधींनी सुरुवात झाली. हा विधी वेदमूर्ती सुहास जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली शरद मुनीश्वर,अनिरुद्ध जोशी, राहूल जोशी, केदार मुनीश्वर , नंदकुमार मराठे अशितोष ठाणेकर आदींनी केला. या विधीसाठी गंगाजलासह देशभरातील विविध नद्यांचे पाणी आणण्यात आले होते. या विधीसाठी खासदार धनंजय महाडीक व त्यांच्या पत्नी अरुंधती, विश्वस्त भरत ओसवाल, पत्नी चंद्रीका, दिंगबर इंगवले व पत्नी सुहासिनी, महेंद्र इनामदार व पत्नी कोमल, मंदार मुनीश्वर व पत्नी वरदलक्ष्मी असे पाच जोड्यांच्या हस्ते हा विधी करुन घेण्यात आला. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अंबाबाई देवी मंदीरातून उत्सवमूर्ती वाजतगाजत आणून पुजा मंडपात ठेवण्यात आलेल्या सुवर्णपालखीमध्ये ती स्थान्नापन्न केली. तर ११:४५ वाजता सर्व विधीनंतर या सुवर्ण पालखीतून प्रथमच मंदीराभोवती प्रदक्षिणा काढण्यात आली. दिवसभरात विविध कार्यक्रमांसह मंगलधाम येथे शुद्धिकरण सोहळ्याचा एक भाग म्हणून १६ कुमारीकांचे पुजन करण्यात आले. सर्व विधिनंतर ही पालखी पुन्हा ट्रस्टकडे नेण्यात आली. ही पालखी लवकरच विविध मान्यवर व करवीर पीठाचे शंकराचार्य यांच्या उपस्थितीत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडे समर्पित केली जाणार आहे.
यावेळी देवस्थान समितीचे सचिव विजय पोवार, सदस्य सुभाष वोरा, संगीता खाडे, शिवाजी जाधव, जिल्हा परिषद सदस्या शौमिका महाडीक, नगरसेवक अजित ठाणेकर, माजी नगरसेवक आर.डी.पाटील, राष्ट्रीय काँग्रेस प्रदेश महीला आघाडी अध्यक्षा सरलाताई पाटील, मंगल महाडीक, पालखी विश्वस्त जितेंद्र पाटील, शिवकुमार पाटील, समीर शेठ, के.रामाराव, त्यागराज शेट्टी, आदी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वर्ण कवचांकित शिबीकार्पण विधी अर्थात शुद्धीकरण विधी असा,
अघोर होम, अंबाबाई देवीस अभिषेक, मानकरी देवतांना आमंत्रण व सन्मान त्यानंतर मुख्य विधीस सुुरुवात झाली. यात आचमन, प्रधानसंकल्प,गणेशपूजन, पुन्याहवाचन,मातृकापूजन,नांदीश्राद्ध, आचार्यवरणादि, पालखीची शुद्धी, अग्न्यूत्तारण, स्नानविधी, मुख्यदेवतास्थापना (ब्रम्हादिमंडलस्थापन, मुख्यदेवता-शिबीकाधिष्ठीत परिवार, कलशांगदेवता), कुंडसंस्कार, अग्निस्थापना, नवग्रहस्थापना, हवन(नवग्रहहोम, मुख्यदेवता व परिवार देवतांचे हवन), शिबिकासमर्पणचा मुख्य संकल्प, मुख्य देवता करवीर निवासीनी अंबाबाई देवीचे शिबिकारोहण-पूजन, महाआरती व शिबीकायात्रा, बलिदान पूर्णाहूती, आज्यावलोकन, उत्तरांग व कर्मसमाप्ती. हा विधी सकाळी ७:३० वाजल्यापासून दिवसभर सुरु होता.

करवीर निवासीनी अंबाबाईसाठी सुवर्ण पालखी करण्याचा संकल्प महालक्ष्मी सुवर्ण पालखी ट्रस्टच्या माध्यमातून केला होता. त्यानूसार भाविकांना सोने दान करण्याचे आवाहन केले होते. त्यात १ ग्रॅम ते १ किलो सोन्यापर्यंत भाविकांनी यथाशक्ती दान केले. त्यातून २६ किलो सोने जमा झाले व त्यातून ही पालखी तयार करण्यात आली. आज या पालखीचा शुद्धीकरण सोहळा विधीवत पुजेने केला. ही सुवर्ण पालखी गरुडमंडपात सुरक्षेचे योग्य ते उपाय करुन ठेवण्यात येणार आहे. यासाठी गरुडमंडपात उजव्या बाजूस विशेष असे बुलेट पु्रफ काच बसविण्यात येणार असून त्यामध्ये ही पालखी ठेवण्यात येईल. या पालखीच्या सुरक्षेसाठी देवस्थान समिती सुरक्षा रक्षक नेमणार आहे.
- खासदार धनंजय महाडीक

Web Title: Excitement of Ambavai Gold Palkhi Purification ceremony of Karviriani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.