माणगावमध्ये खुल्या आरक्षणामुळे उत्साह

By admin | Published: December 28, 2016 12:05 AM2016-12-28T00:05:54+5:302016-12-28T00:05:54+5:30

इच्छुकांची मोठी रांग : राजकीय युत्या कशा होतात यावरच समीकरणे अवलंबून; पुनर्रचनेमुळे उमेदवारांची दमछाक होणार

Excitement due to open reservation in Mangaon | माणगावमध्ये खुल्या आरक्षणामुळे उत्साह

माणगावमध्ये खुल्या आरक्षणामुळे उत्साह

Next

नंदकुमार ढेरे --चंदगड --मतदारसंघ पुनर्रचनेत पूर्वीचा हलकर्णी जिल्हा परिषद मतदारसंघाचे नाव आता माणगाव जि. प. असे झाले आहे. पूर्वीचे हलकर्णी व कुदनूर जि.प. मतदारसंघातील काही गावे समाविष्ठ करून माणगाव हा नवीन मतदारसंघ तयार करण्यात आला आहे. हा मतदारसंघ सर्वसाधारण पुरुष उमेदवारासाठी खुला झाल्याने या ठिकाणी डझनावर उमेदवार निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. हा मतदारसंघ माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील व माजी आमदार (कै.) नरसिंगराव पाटील यांचा बालेकिल्ला आहे. परंतु, या निवडणुकीत राजकीय युत्या कशा होतात यावरच बरेच काही अवलंबून आहे. या मतदारसंघावर (पूर्वीच्या हलकर्णी जि. प.) भरमू पाटील यांचेच वर्चस्व राहिले आहे.
२००० ते २०१२ पर्यंत माजी सभापती भरमाण्णा गावडा, तर २०१२ सालच्या निवडणुकीत भरमू पाटील यांच्या स्नुषा जि. प.च्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ज्योती दीपक पाटील निवडून आल्या आहेत. याच जि.प. मतदारसंघांतर्गत पंचायत समितीच्या माणगाव गणातून अनिल सुरुतकर व हलकर्णी गणातून उपसभापती शांताराम पाटील निवडून आले आहेत.
माणगाव मतदारसंघ यावेळी खुला झाल्याने राष्ट्रीय काँगे्रस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना यासह अपक्ष उमेदवारही आपले नशीब आजमावणार आहेत. त्यामुळे या मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या डझनावर असेल. या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या ज्योती दीपक पाटील यांनी गेल्या अडीच वर्षांत गाववार विकासकामे केली आहेत.
तरुण मंडळे, महिला मंडळे, भजनी मंडळे यासह शेतकरी वर्गासाठी राबविलेल्या विविध प्रकारच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांमुळे त्यांनी मतदारसंघावर मजबूत पकड निर्माण केली आहे. त्याचा लाभ यावेळी या मतदारसंघात उभे राहणाऱ्या राष्ट्रीय काँगे्रसच्या उमेदवाराला होणार आहे.
गतनिवडणुकीत तुर्केवाडी जिल्हा परिषद मतदार संघातून निवडून गेलेले सदस्य महेश पाटील यावेळी माणगाव मतदारसंघातून निवडणूक न लढवण्याची शक्यता आहे. त्यांचे बंधू गोकुळ दूध संघाचे संचालक राजेश पाटील हेदखील याच मतदारसंघातून निवडणुकीस उभे राहण्याची शक्यता आहे. मात्र, हे त्यावेळच्या राजकीय परिस्थितीवर अवलंबून असेल.
याशिवाय पंचायत समिती सदस्य अनिल सुरूतकर, माणगावचे तंटामुक्त अध्यक्ष शामराव बेनके, कोवाडचे माजी सरपंच उद्योजक कल्लाप्पा भोगण, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष संजय उर्फ भुजंगराव पाटील, तालुकाध्यक्ष एम. जे. पाटील, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख प्रभाकर खांडेकर, ग्राहक सेनेचे तालुकाध्यक्ष राजू रेडेकर, भाजपमधून सुरेश घोटगे, स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष बाळाराम फडके, प्रा. दीपक पाटील, बळीराजा शेतकरी संघटनेचे नितीन पाटील, गौरव नाईक यांच्यासह काही अपक्षही निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे.
मतदारसंघ पुनर्रचनेत भौगोलिक विस्तार पाहता नागनवाडी ते राजगोळी-यर्तेनहट्टी असे ५० कि. मी. अंतराचा हा मतदारसंघ तयार झाला आहे. त्यामुळे विस्ताराने मोठा असलेल्या या मतदारसंघात कमी कालावधीत प्रत्येक कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवताना आणि मतदारांपर्यंत पोहोचताना उमेदवारांची दमछाक होणार आहे.


माणगाव
माणगाव जि.प. मतदारसंघाची एकूण संख्या ३८,०५२ इतकी असून, या मतदारसंघांतर्गत माणगाव पंचायत समिती मतदारसंघ नागरिकांचा मागासप्रवर्ग महिला तर कुदनूर पंचायत समिती मतदारसंघ सर्वसाधारण महिला वर्गासाठी आरक्षित झाला आहे.


कुदनूर पंचायत समिती
घुल्लेवाडी ७०४, जक्कनहट्टी २८४, निट्टूर २२४९, तेऊरवाडी १५३६, कोवाड २६९८, दुंडगे ९४९, चिंचणे ४७३, कामेवाडी ७६९, राजगोळी खुर्द २२९८, चेन्नेट्टी-यर्तनहट्टी ५९५, राजगोळी बुद्रक ८६८, दिंडलकोप ६२१, तळगुळी १०७९, कुदनूर ३०७३.
अप्पी पाटलांचे
उमेदवार रिंगणात
गत विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकाची मते घेतलेले जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अप्पी उर्फ विनायक पाटील, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत सोयीनुसार आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपली ताकद निर्माण करण्याचा प्रयत्न करतील.

Web Title: Excitement due to open reservation in Mangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.