भादोलेत डेल्टा प्लसचा रुग्ण आढळल्याने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:31 AM2021-08-17T04:31:15+5:302021-08-17T04:31:15+5:30
भादोले : भादोले येथे कोरोना डेल्टा प्लस विषाणूचा रुग्ण आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. भादोलेत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील उपचार ...
भादोले : भादोले येथे कोरोना डेल्टा प्लस विषाणूचा रुग्ण आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. भादोलेत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या दहा आहे. कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचे चित्र असतानाच डेल्टा प्लसचा एक रुग्ण आढळल्याचा अहवाल आल्याने खळबळ उडाली आहे.
भादोलेत एक डेल्टा प्लस कोरोना रुग्ण असल्याचा अहवाल काल प्राप्त झाला. हा रुग्ण जुलैमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आला होता. यानंतर अतिग्रे येथील कोविड सेंटरमध्ये हा रुग्ण उपचार घेत होता. तो बरा होऊन घरी आला आहे. तब्बल महिन्याने हा रुग्ण डेल्टा प्लसने बाधित असल्याचा अहवाल आला. यामुळे भादोले गावात एकच खळबळ उडाली. भादोले आरोग्य केंद्राने या रुग्णाला तत्काळ गृह अलगीकरणात ठेवले. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करत आरोग्य केंद्राने हा रुग्ण राहात असलेल्या शंभर घरांचे सर्वेक्षण केले.
भादोलेत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ४३८ इतके रुग्ण सापडले तर ४१२ रुग्ण बरे झाले असून, १२ जणांचा मृत्यू झाला आहे.