‘ईडी’च्या छाप्याने पश्चिम महाराष्ट्रात खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 01:56 PM2019-06-21T13:56:43+5:302019-06-21T14:13:13+5:30
कोट्यवधी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता असल्याच्या संशयातून ‘ईडी’च्या पथकाने कोल्हापूरसह इचलकरंजी व जयसिंगपूर येथे छापे टाकल्याने पश्चिम महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. कोल्हापूरपाठोपाठ सांगली, सातारा येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, नामवंत डॉक्टरांची नावे रडारवर आहेत.
कोल्हापूर : कोट्यवधी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता असल्याच्या संशयातून ‘ईडी’च्या पथकाने कोल्हापूरसह इचलकरंजी व जयसिंगपूर येथे छापे टाकल्याने पश्चिम महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. कोल्हापूरपाठोपाठ सांगली, सातारा येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, नामवंत डॉक्टरांची नावे रडारवर आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून हे पथक जिल्ह्यात तळ ठोकून असून, त्याने संबंधितांचे घर, कार्यालय, सराफ दुकान, हॉस्पिटल, फार्म हाऊसची चौकशी सुरू ठेवली आहे. छापासत्रामुळे व्यापारी, डॉक्टर आणि बांधकाम व्यावसायिकांनी धास्ती घेतली आहे. कोल्हापुरातील आणखी दोन बांधकाम व्यावसायिक रडारवर आहेत.
कोल्हापुरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, इचलकरंजीतील माजी नगरसेवक, जयसिंगपूरमधील डॉक्टर व सराफ या चौघांची पथकाकडून कसून चौकशी सुरू आहे. कोल्हापूरसह सांगली, सातारा येथील काहीजण रडारवर आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक बडे व्यापारी, बांधकाम व्यावसायिक आणि नामवंत डॉक्टरांची यादी ‘ईडी’कडे आहे. शासनाचा कोणत्याही प्रकारचा टॅक्स न भरता त्यांनी आपले उद्योग सुरू केले आहेत. यातून कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता त्यांच्याकडे असल्याच्या तक्रारी ‘ईडी’कडे केल्या होत्या.
काही सामाजिक कार्यकर्त्यांनी निनावी पत्राद्वारे या तक्रारी केल्या आहेत. या सर्वांवर कारवाईचा बडगा उचलला जाणार असल्याचे सगळेच भेदरून गेले आहेत. पथक आपल्यापर्यंत पोहोचू नये यासाठी, काहीजण भीतीने दुकाने बंद करून, घराला कुलूप लावून कुटुंबासह पर्यटनवारीला गेल्याची चर्चा आहे.
मोबाईल बंद
‘ईडी’चे पथक कोल्हापुरात आल्याचे समजल्यावर बड्या उद्योजकांनी आपल्या सहकारी मित्रांना फोन करून याची कल्पना दिली. त्यानंतर काहींनी आपले मोबाईल बंद करून ठेवले, तर काहीजण शेजारच्या राज्यात पळाल्याने त्यांचे मोबाईल नॉट रिचेबल, संपर्कक्षेत्राच्या बाहेर असल्याची चर्चा आहे.
नावाची जोरदार चर्चा
‘ईडी’चा छापा पडलेला माजी नगरसेवक, डॉक्टर, बांधकाम व्यावसायिक, सराफ व्यापारी कोण, याबाबत लोक तर्कवितर्क लावीत होते. व्यापारी एकमेकांना फोनवरून विचारणा करीत होते. पथक कुठे आहे, याबाबतही काहीजण माहिती घेत होते; परंतु ज्यांची चौकशी झाली तेसुद्धा आपणाला काहीच माहिती नसल्याचे दाखवीत होते. पथकाने त्यांना सुरुवातीलाच गोपनीयता पाळण्याच्या सूचना दिल्याचे समजते.