शाळाबाह्य कामांतून वगळावे
By admin | Published: November 8, 2015 12:31 AM2015-11-08T00:31:30+5:302015-11-08T00:35:01+5:30
शिक्षकांची मागणी : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा धडक मोर्चा
कोल्हापूर : शिक्षकांना ‘बीएलओ’, ‘एनपीआर’ सर्वेक्षणे, आदी शाळाबाह्य कामांतून वगळावे, यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर शनिवारी धडक मोर्चा काढण्यात आला. मोर्चात मोठ्या संख्येने शिक्षक सहभागी झाले होते.
दसरा चौक येथून दुपारी मोर्चाला सुरुवात झाली. खानविलकर पेट्रोलपंपमार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय येथे आला. या ठिकाणी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला. तीव्र निदर्शने करीत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यानंतर शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी एस. आर. बर्गे यांना निवेदन सादर केले. १ नोव्हेंबर २००५नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांना नवीन पेन्शन योजना लागू करावी, आंतर जिल्हा बदलीसाठी राज्यस्तरावर रोस्टर करून बदलीचा प्रश्न सोडवावा, जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या तालुकांतर्गत व महापालिका शिक्षकांच्या बदल्या आपापसात विना अट करण्यात याव्यात, शिक्षकांचे वेतन दरमहा
१ तारखेला व्हावे, विषय शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी मिळावी, पटनिकषांमध्ये सुधारणा करावी, २० पेक्षा कमी पट शाळा करूनयेत, अल्पसंख्याक व डोंगरी शाळांसाठी पटाची सवलत असावी, शाळा बांधकाम व शालेय पोषण आहार योजना स्वतंत्र यंत्रणेकडून राबविण्यात यावी, प्राथमिक शिक्षकांच्या पाल्यांना उच्च शिक्षणातील फी ची सवलत मिळावी, शिक्षकांना पोलीस पंचनाम्यासाठी सरकारी साक्षीदार म्हणून बोलविण्याची सक्ती करू नये, अशा विविध मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
आंदोलनात संघटनेचे राज्य कोषाध्यक्ष एन. वाय. पाटील, जिल्हाध्यक्ष रवीकुमार पाटील, सरचिटणीस सुनील पाटील, बाळकृष्ण हळदकर, दुंडू खामकर, अरुण चाळके, मधुकर येसाणे, सुहास शिंत्रे, विलास पाटील, रघुनाथ खोत, दिनकर पाटील, संभाजी पाटील यांच्यासह शिक्षक सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)