कोल्हापूर जिल्ह्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 04:47 PM2019-01-04T16:47:04+5:302019-01-04T16:51:36+5:30
कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीचा छोटा गट असलेली समिती रद्द करून, राज्यशासनाने कोल्हापूर जिल्ह्यासाठी नवीन कार्यकारी समिती स्थापन केली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे या समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीची पहिली बैठक दोन दिवसांत होणार आहे.
कोल्हापूर : जिल्हा नियोजन समितीचा छोटा गट असलेली समिती रद्द करून, राज्यशासनाने कोल्हापूर जिल्ह्यासाठी नवीन कार्यकारी समिती स्थापन केली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे या समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीची पहिली बैठक दोन दिवसांत होणार आहे.
यापूर्वी जिल्हा नियोजन मंडळापुढे जी कामे मंजुरीसाठी येतात, त्याची छाननी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील पाचजणांची समिती होती. त्यास छोटा गट म्हटले जाई. या समितीत आमदार सुरेश हाळवणकर, भाजपचे हेमंत कोलेकर, विजय सूर्यवंशी आणि जिल्हा नियोजन अधिकारी यांचा समावेश होता.
ही समिती जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असल्याने प्रस्तावावर निर्णय घेण्यात मर्यादा येत होत्या; त्यामुळे अगोदरची समिती बरखास्त करून, नव्या समितीची स्थापना करण्यात आली आहे. यावर्षी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याने जिल्हा नियोजन समितीच्या आराखड्यास फेब्रुवारीतच मंजुरी दिली जाणार आहे; त्यामुळे त्यापूर्वी त्यातील प्रस्तावांची छाननी व्हावी, यासाठी या कार्यकारी समितीची बैठक येत्या दोन दिवसांतच घेण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
नव्या समितीचे स्वत: पालकमंत्री पाटील हेच अध्यक्ष असल्याने कोणत्या प्रस्तावांना नियोजन समितीच्या आराखड्यात समाविष्ट करायचे व कोणत्या नाही याचा निर्णय कार्यकारी समितीच्या पातळीवरच होणार आहे. अधिकाराच्या पातळीवर ही समिती जास्त सक्षम मानली जाते.
अशी आहे समिती
अध्यक्ष - पालकमंत्री कोल्हापूर
विशेष निमंत्रित सदस्य : खासदार संभाजीराजे, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार सुजित मिणचेकर व भाजपचे कार्यकर्ते राजाराम शिपुगडे.
सदस्य : विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी कोल्हापूर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी